खड्डे आणि तुटलेल्या गतिरोधकांमुळे अपघातांचा धोका
साईडपट्ट्या आणि डिव्हायडरमधील वाढलेल्या गवतामुळे वाहनचालकांची गैरसोय
रस्त्याची तातडीने देखभाल करण्याची सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांची मागणी
आनंद सकपाळ | नेरळ:
कर्जत–कल्याण राज्य महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांवर तसेच मध्यभागी असलेल्या डिव्हायडरमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. वाढलेल्या गवतामुळे रस्त्याच्या कडेला असलेली वाहने, पादचारी तसेच समोरून येणारी वाहने दिसण्यात अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून गतिरोधकही तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी डिकसळ येथील एका युवकाचा उमरोली परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कोशाणे, डिकसळ यांसह महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी गतिरोधकांची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या आणि डिव्हायडरमधील गवताची नियमित साफसफाई होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढलेल्या गवतामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे वेळेत दिसत नाहीत. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
सदर महामार्गाची निर्मिती करणाऱ्या संबंधित कंपनीकडे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीकडून तातडीने आवश्यक कामे करून घ्यावीत, अशी मागणी डिकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांनी केली आहे.
महामार्गावरील साईडपट्ट्या व डिव्हायडरमधील गवत तातडीने कापून स्वच्छ करावे, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि तुटलेल्या गतिरोधकांची दुरुस्ती करावी. तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नियमित देखभाल केली जावी, अशी मागणीही शेळके यांनी केली आहे.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोके वेळीच दूर करून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार या मागणीची कितपत दखल घेतात, याकडे आता महामार्गावरील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.







