शेतकऱ्यांच्या जनआक्रोशानंतर विधानाबद्दल व्यक्त केली दिलगिरी
सतिश पाटील / बोरगांव, कर्जत:
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर धरण प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पोशीर धरणाबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवराम बदे यांनी केलेल्या विधानामुळे पोशीर धरण बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या विधानाचा निषेध करत शेतकऱ्यांनी जनआक्रोश व्यक्त केला होता. तसेच शिवराम बदे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आज अखेर शिवराम बदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच जाहीर माफी मागून यापुढे पोशीर धरण प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारचे चुकीचे किंवा गैरसमज निर्माण करणारे विधान करणार नाही, असे आश्वासन दिले.
दरम्यान, पोशीर धरण प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील शेतजमिनी, घरे आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून आपला विरोध नोंदवत आहेत. धरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.
यावेळी पोशीर धरण हटाव समितीचे पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







