टोरंट प्रकल्पाच्या मुद्द्यावर ॲड. हृषीकेश जोशी यांचा भाजपला रामराम
हिंदुत्ववादी असलो तरी पर्यावरणविरोधी आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधात आवाज उठवणार
कोणत्याही पक्षात जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | कर्जत:
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत केलेले कार्य संपवित असल्याची घोषणा करत ॲड. हृषीकेश जोशी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा जड अंतःकरणाने राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. कर्जत परिसरातील प्रस्तावित टोरंट प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या जोशी यांनी पर्यावरणाची हानी, वन विभाग आणि पर्यावरण विभागाच्या कथित गैरकृत्यांविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, आपण हिंदुत्ववादी असून कायद्याचे विद्यार्थीही आहोत. हिंदुत्ववादी असणे म्हणजे पर्यावरणविषयक प्रश्नांवर किंवा सरकारविरोधी मुद्द्यांवर आवाज उठवू नये, असा कोणताही नियम नाही. टोरंट प्रकल्पाच्या संदर्भात वन विभाग आणि पर्यावरण विभागाकडून झाल्याचा आरोप असलेली गैरकृत्ये धक्कादायक आणि घातक असून, त्याविरोधात लढणे हे राष्ट्रहिताचे कार्य आहे.
मनमानी सहन करणार नाही; वेळप्रसंगी आरपारची लढाई लढू
टोरंट प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिक पर्यावरण, वृक्षसंपदा, पशुपक्षी आणि निसर्गावर घाला घातला जात असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण ज्या भूमीत लहानाचे मोठे झालो, खेळलो-बागडलो, त्या भूमीवर व्यापारी वृत्तीने कथित बोगस कागदपत्रे तयार करून निसर्गाची हानी केली जात असेल, तर अशा प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
“या मनमानीविरोधात वेळप्रसंगी आरपारची लढाई लढावी लागली तरी चालेल; मात्र अन्याय सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
ब्रिटिशकालीन मैदानाच्या लढ्यालाही सात वर्षांपासून न्याय नाही
कर्जतच्या ब्रिटिशकालीन मैदानाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. या प्रकरणात सुमारे सात वर्षांपासून न्याय मिळालेला नसल्याची खंत व्यक्त करत, पक्षाचे पद आणि पक्षाचा मुकुट धारण करून सामाजिक प्रश्नांसाठी किती काळ संघर्ष करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपमधील पदांचा आणि नेत्यांच्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख
भाजपमध्ये कार्यरत असताना युवा मोर्चाचे प्रदेश सचिव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा जबाबदाऱ्या मिळाल्याचे तसेच मागील नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विविध सामाजिक कामांसाठी वैयक्तिक पातळीवर मदत केल्याबद्दल त्यांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानले. त्यांच्या सहकार्याबद्दल आपण आजन्म ऋणी राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कोणत्याही पक्षात जाणार नाही; सामाजिक आणि पर्यावरणीय लढा सुरूच
सरकारविरोधी भूमिका घेण्याच्या कारणास्तव पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट करत, आपण अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे ॲड. जोशी यांनी जाहीर केले. हिंदुत्ववादी विचारांशी संबंधित विषय आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधातील लढे यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळत असल्याचे नमूद करत, कोणत्याही अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, उद्या आपला वाढदिवस असून भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय हेच स्वतःसाठी वाढदिवसाचे गिफ्ट असल्याचे त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
टोरंट प्रकल्प आणि ब्रिटिशकालीन मैदानाच्या संरक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष यापुढे पक्षीय चौकटीबाहेर राहून अधिक तीव्र करण्याचा ॲड. हृषीकेश जोशी यांचा निर्धार या पोस्टमधून स्पष्ट झाला आहे.







