शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन
दिपक बोराडे | नेरळ:
कर्जत तालुक्यातील कळंब परिसरातून उन्नती यतीनचंद्र झुंझारराव ही २१ वर्षीय तरुणी संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर तरुणी माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) विभागाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, ती अचानक निघून गेल्याने कुटुंबियांसह परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणी उन्नती हिचा रंग गोरा, बांधा मध्यम असून तिचे केस लांब व काळ्या रंगाचे आहेत. ती घरातून बाहेर पडली तेव्हा तिने लाल रंगाचा टी-शर्ट आणि ग्रे (राखाडी) रंगाची पँट परिधान केली होती. तसेच तिच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा आहे. तिच्या उजव्या हाताच्या करंगळीशेजारच्या बोटात चांदीची अंगठी, हातात सोनेरी रंगाचे घड्याळ आणि पायात ‘बाटा’ कंपनीची निळ्या रंगाची सँडल आहे. तिच्याकडे खांद्याला अडकवण्याची निळ्या रंगाची बॅगदेखील आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला असून, सदर तरुणी किंवा तिचे वर्णन जुळणारी कोणतीही व्यक्ती आपल्या हद्दीत, परिसरात अथवा अन्यत्र कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती मिळताच नागरिकांनी तपासी अंमलदार पोलीस हवालदार कोंडार (बकल नंबर २३०८) यांच्या ९५९५३९८४६७ या मोबाईल क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.







