बाधित शेतकऱ्यांची आमदार भास्कर जाधव यांच्याशी भेट
संयुक्त बैठकीचे आश्वासन
सतीश पाटील | बोरगाव, कर्जत:
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर धरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या जमिनी, शेती आणि नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या पोशीर धरणबाधित शेतकऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची मुंबई येथील शिवसेना भवन येथे भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आमदार जाधव यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले, तसेच लवकरच सर्व बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली.

कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पोशीर धरण प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे शेती, जमिनी, स्थानिक नागरिकांचे भविष्य आणि परिसरातील नैसर्गिक संपत्तीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बाधित शेतकरी संघटित होत असून, विविध माध्यमांतून आपला विरोध नोंदवत आहेत.

याच पार्श्वभूमीवर १७ मार्च रोजी शेतकऱ्यांनी कर्जत येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून पोशीर धरण प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर मागील महिन्यात वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या मोजणीच्या कामालाही स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रशासकीय हालचालींमुळे शेतकऱ्यांमधील असंतोष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
पोशीर धरण प्रकल्पाविरोधातील लढ्याला पाठिंबा मिळावा आणि बाधित शेतकऱ्यांच्या समस्या वरिष्ठ स्तरावर मांडता याव्यात, या उद्देशाने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील शिवसेना भवन येथे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या समस्या, शेतकऱ्यांचा विरोध आणि भविष्यातील आंदोलनाची दिशा याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे संघर्ष करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व बाधित शेतकरी एकत्र आले, तर त्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडता येईल, असा संदेश त्यांनी दिला. तसेच पोशीर धरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या आश्वासनामुळे पोशीर धरणविरोधी आंदोलनाला पुढील काळात कोणती दिशा मिळते, याकडे आता स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या भेटीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख बाजीराव दळवी आणि रामदास घरत उपस्थित होते.
तसेच पोशीर धरण हटाव समितीचे अध्यक्ष तानाजी चौधरी, दिनेश पाटील, लक्ष्मण पोसाटे, जनार्दन पाटील, ललित धस, नितीन पाटील, सुधीर शेळवले, हरिश्चंद्र शेळवले, समीर खडेकर आणि सतीश पाटील यांच्यासह कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे, सचिन गायकवाड आणि धर्मेंद्र मोरे उपस्थित होते.








