विजेची एवढी गरज का? दोन हजार कोटी आले कुठून?
दिगंबर चंदने | कर्जत:
कर्जत तालुक्यातील साई डोंगरातील टोरेंट पॉवरच्या प्रकल्पासाठी सुरु असलेल्या बेसुमार वृक्षतोडीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत पोलीस ग्राउंडवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेला हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. मनसेने या सभेसाठी सह्याद्री जागा हो असा नारा दिला होता.
सकाळी राज ठाकरे यांनी थेट साई डोंगरावर जाऊन तोड झालेल्या जंगलाची पाहणी केली. टोरेंटच्या साडे तेरा हजार कोटींच्या पम्पड स्टोरेज प्रकल्पासाठी बत्तीस हजार चारशे नव्वद झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली असून ग्रामसभेला न विचारताच ही तोड सुरु केल्याचा आरोप स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.

सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की कुऱ्हाडीची काठी फिरते तेव्हा आवाज येतो पण देवाची काठी फिरते तेव्हा आवाज येत नाही. झाड तोडीमुळे पक्षांची घरटी उध्वस्त झाली असून ते पक्षी आकाशात घिरट्या घालून आमची घरटी गेली कुठे असे विचारत होते, असे विदारक दृश्य असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणात विजेची गरज आहे तरी का, असा सवाल त्यांनी केला. एका आमदारासाठी पन्नास कोटी म्हणजे चाळीस आमदारांसाठी दोन हजार कोटी, हे पैसे आणले कुठून, याचा हिशोब जनतेला द्या, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज जर आपण या जंगलतोडीकडे दुर्लक्ष केले तर उद्या आपलीच मुलं-बाळं आपल्याला विचारतील की बाबा, तुम्ही काय करत होता जेव्हा आमची जंगलं विकली जात होती.
या सभेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी विचार मांडले. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील व्यासपीठावर उपस्थित होते.








