युवा उद्योजिका सागरिका जांभळे यांचा मुंबईत विशेष सन्मान
मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते गौरव
उद्योगविश्वासह सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | खालापूर:
अल्पवयातच उद्योजकीय क्षेत्रात पदार्पण करून उद्योगविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रायगडच्या युवा उद्योजिका सागरिका योगिता शेखर जांभळे यांचा शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील मुलुंड येथे विशेष सन्मान करण्यात आला. मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी MCHI, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि मिड-डे चे राहुल शुक्ला उपस्थित होते.
मुलुंड येथील कालिदास सभागृहात आयोजित Mid-Day Hot Property Exhibition, Mulund या कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासून व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सागरिका या सध्या Raigad Business Initiatives च्या संस्थापक व प्रमुख म्हणून कार्यरत असून, आगामी Raigad Business Expo 2026 च्या आयोजनाचे नेतृत्व करीत आहेत.

रायगडच्या उद्योगविश्वाला नवी दिशा
Raigad Business Initiatives च्या वतीने दिनांक २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एन. डी. स्टुडिओ, चौक, रायगड येथे तीन दिवसीय Raigad Business Expo 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध व्यावसायिक क्षेत्रांतील १०० पेक्षा ज्यास्त स्टॉल्स उभारण्याचे नियोजन आहे.
उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप्स, रोजगाराच्या संधी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, तसेच विविध क्षेत्रांतील उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादार यांना एकाच व्यासपीठावर आणणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.
युवा उद्योजिका ते जागतिक विक्रमाचे ध्येय
अवघ्या २१व्या वर्षी मोठ्या व्यावसायिक प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारून सागरिका जांभळे यांनी युवा नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. महिला उद्योजक म्हणून इतक्या कमी वयात उद्योगविश्वासाठी व्यापक व्यासपीठ उभारण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय मानला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे ध्येयही त्यांनी ठेवले आहे.
सामाजिक कार्यातूनही वेगळी ओळख
व्यावसायिक क्षेत्रासोबतच सागरिका जांभळे या सहज महिला फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. महिलांचे सक्षमीकरण आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून, लहान वयापासूनच त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्या Leo Club of Equinox आणि Lions Club of Kharghar Kopra या आंतरराष्ट्रीय क्लबच्या सदस्य आहेत. तसेच उद्योजकांच्या Saturday Club, Kharghar यांच्याशीही त्या जोडलेल्या आहेत. सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक प्रगती यांचा समतोल साधत त्या आपली वाटचाल करीत आहेत.
उद्योगांना एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प
Raigad Business Initiatives या संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक सल्ला, उद्योगांसाठी विविध सेवा, आर्थिक सहाय्यविषयक मार्गदर्शन, सौरऊर्जा उपाययोजना, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने त्या काम करीत आहेत. संस्थेच्या ISO 9001:2015 मानांकनाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
युवा वयात उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि उद्योगविकास या तिन्ही क्षेत्रांत सक्रिय योगदान देणाऱ्या सागरिका जांभळे यांचा मुंबईत झालेला हा सन्मान रायगडच्या नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या या यशाबद्दल उद्योग व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








