कर्जत चार फाट्यावर दिसली वाहतूक कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता
अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडून दिला
नरेश जाधव | कर्जत:
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उन-पावसाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांचे एक वेगळे आणि माणुसकीचे रूप आज सकाळी कर्जत चार फाटा येथे पाहायला मिळाले.
कर्जत चार फाटा परिसरात एका अपघातग्रस्त अपंग व्यक्तीस रस्ता ओलांडताना अडचण येत असल्याचे लक्षात येताच दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी पुढे होत त्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून दिला. या प्रसंगाने वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबरोबरच त्यांच्या सामाजिक जाणीवेचेही दर्शन घडले.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहतूक कोंडी सोडवणे, वाहनचालकांना शिस्त लावणे तसेच नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही वाहतूक कर्मचाऱ्यांची दैनंदिन जबाबदारी आहे. कर्जत शहरात विशेषतः गर्दीच्या वेळेत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. अशा वेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी सातत्याने रस्त्यावर कार्यरत असतात.
मात्र, वाहतूक नियमन करताना अनेकदा या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली किंवा नियमांचे पालन करण्यास सांगितले, तर काही वेळा त्याचा राग वाहतूक कर्मचाऱ्यांवर व्यक्त केला जातो. तरी देखील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत हे कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहतात.
याच कर्तव्याच्या धावपळीत आज कर्जत चार फाटा येथे मात्र त्यांच्या कार्याची आणखी एक सकारात्मक बाजू समोर आली. अपघातामुळे त्रस्त आणि अपंग असलेल्या व्यक्तीला रस्ता ओलांडताना अडचण येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी केवळ वाहतूक नियंत्रणापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केला.
हा प्रसंग कदाचित काही क्षणांचाच होता, मात्र अशा छोट्याशा कृतीतून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे.
शासकीय कर्मचारी म्हटले की केवळ नियम, कायदे आणि कर्तव्य एवढ्याच चौकटीत त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र कर्तव्य बजावत असतानाच एखाद्या गरजू नागरिकाला मदत करणे, त्याच्या अडचणीची दखल घेणे आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणे ही देखील सार्वजनिक सेवेचीच एक महत्त्वाची बाजू आहे.
कर्जत शहरातील या दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी केलेली ही छोटीशी मदत त्यामुळेच विशेष कौतुकास्पद ठरत आहे . अशा संवेदनशील आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक कार्याची दखल घेऊन त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे.
कारण वाहतूक सुरळीत करणारे हात जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला आधार देतात, तेव्हा ‘कर्तव्य’ आणि ‘माणुसकी’ यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.







