गोरठण बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
सुधीर देशमुख / खालापूर:
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माजी विद्यार्थी सामाजिक संस्था, वावोशी विभाग यांच्या वतीने गोरठण बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सन १९७९ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘माजी विद्यार्थी सामाजिक संस्था’ या नावाने सन २०२३ मध्ये संस्थेची नोंदणी केली. स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी व सदस्य विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संस्थेने संकल्प केला आहे.
मागील चार वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गोरठण बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर बॅग, पाण्याच्या बाटल्या, चित्रकला वह्या व साहित्य, विविध प्रकारच्या वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सिल, कंपास पेट्या, छत्र्या, रेनकोट आदी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

दैनंदिन शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू एकाच वेळी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शैक्षणिक साहित्याच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वासही वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती रघुनाथ भाई शिंदे, पंचायत समिती सदस्या प्रमिला महेश पाटील तसेच जनतेतून थेट निवडून आलेले गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच सागर तुकाराम हाडप यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती रघुनाथ भाई शिंदे यांनी गोरठण शाळेच्या कंपाऊंडसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील आणि सरपंच सागर हाडप यांनीही भविष्यात शाळेच्या विकासासाठी आवश्यक ती भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य मयूर धारवे, शाळा समिती अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या प्रतीक्षा चव्हाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, सेवानिवृत्त शिक्षक गिरीधर पिंगळे, आदर्श शेतकरी कानोजी जाधव, ज्येष्ठ नागरिक सुभाष पाटील व बी. एल. पाटील यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरठण बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला मिसाळ, शिक्षक संदीप सुर्वे, शिक्षक अशोक गिते तसेच टाटा संस्थेच्या शिक्षिका वृषाली पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, सरचिटणीस हरिश्चंद्र पाटील, खजिनदार शांताराम जाधव, कार्याध्यक्ष ज्योती माणकवले, उपाध्यक्ष नारायण मोरे, सरचिटणीस चंद्रकांत कार्लेकर तसेच सदस्य खंडू भोईर, गुणाजी भोसले, तानाजी पाटील, नामदेव जाधव, सुरेश ठाकूर, संतोष हातानोलकर, धनंजय पाटील, चंद्रकांत पाटील, बाळाराम पाटील आणि डॉ. सुनील देवडीकर यांनी विशेष सहकार्य केले.
गरजू विद्यार्थ्यांना दिलेली मदत म्हणजे केवळ शैक्षणिक साहित्याचे वाटप नसून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केलेली एक सकारात्मक गुंतवणूक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणासाठी पुढाकार घेतल्यास आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही. माजी विद्यार्थी सामाजिक संस्थेने चार वर्षांपासून सातत्याने सुरू ठेवलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माजी विद्यार्थ्यांच्या कर्तव्यभावनेचा आदर्श निर्माण करणारा असून, समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.







