कडाव–मानकिवली, ललानी रोड, सुरभी चौक–श्रीराम पूल, कर्जत चारफाटा–रेल्वे ब्रिज ते पाली तर्फे कोथळ खलाटीपर्यंत रस्त्यांची दुरवस्था
“खड्डेमुक्त रस्ते हा आमचा हक्क”; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा आक्रोश
नरेश जाधव / कर्जत:
कर्जत शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेषतः कडाव–मानकिवली गाव ते टाटा रोड, सुरभी चौक ते जुना व नव्याने बांधण्यात आलेला श्रीराम पूल, ललानी रोड, कर्जत चारफाटा ते रेल्वे ब्रिज तसेच पाली तर्फे कोथळ खलाटी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गांवरून दररोज हजारो नागरिक प्रवास करत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कर्जत शहरातील ललानी रोडची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. रस्ता आणि गटारे असूनही संपूर्ण रस्त्यालाच गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी गटाराचे व पावसाचे पाणी साचल्याने रस्ता कुठे आणि गटार कुठे हेच ओळखणे कठीण झाले आहे. या मार्गावरून पायी जाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे चिखल व गटाराचे पाणी उडत असून आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आता सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाली तर्फे कोथळ खलाटी येथील एका नागरिकाने, “आमच्या गावाला १५ वर्षे झाली तरी दर्जेदार रस्ता झालेला नाही. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. प्रकल्प पाहण्यासाठी मोठमोठे नेते येतात, मात्र रस्त्यांची दुरवस्था कुणालाच दिसत नाही. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीमार्फत खड्डे बुजविण्याबाबत पत्र दिले होते, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही,” अशी खंत व्यक्त केली आहे. अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत असून प्रशासनाविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे.

याबाबत माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकेश जाधव यांनी प्रशासनाला तातडीने जागे होण्याचे आवाहन केले आहे. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी दर्जेदार व कायमस्वरूपी रस्त्यांची कामे हाती घेऊन कडाव–मानकिवली–टाटा रोड, सुरभी चौक–श्रीराम पूल, ललानी रोड, कर्जत चारफाटा–रेल्वे ब्रिज तसेच पाली तर्फे कोथळ खलाटी येथील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे कर्जत चारफाटा ते रेल्वे ब्रिज या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर यापूर्वीही खड्ड्यांच्या समस्येबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्यात आले; मात्र काही दिवसांतच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. यामुळे प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

करदात्या नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे सांगत, “मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? खड्डेमुक्त रस्ते हा आमचा हक्क आहे; उपेक्षा नको, कृती हवी,” अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कर्जत शहरासह ग्रामीण भागातील रस्ते अखेर खड्डेमुक्त कधी होणार? स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते नागरिकांना कधी मिळणार? असा संतप्त सवाल वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.








