नेरळ–वाकस–कशेळे एसटी बससेवा पुन्हा रुळावर
कर्जत प्रेस असोसिएशनसह विविध संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
मुसळधार पावसात उत्साहात बस सेवेचे उद्घाटन
दीपक बोराडे / रामदास माळी | नेरळ:
गेल्या तब्बल १२ वर्षांपासून बंद असलेली नेरळ–वाकस–कशेळे एसटी बससेवा अखेर सोमवार (३ ऑगस्ट २०२६) रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. नेरळ बसस्थानक येथे मुसळधार पावसात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या ऐतिहासिक क्षणाचे जल्लोषात स्वागत केले. पावसाची तमा न बाळगता ग्रामस्थ, प्रवासी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि एसटी प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
उद्घाटन सोहळ्यास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, एसटी आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे, स्थानिक प्रमुख देवानंद मोरे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन करण्यात आले आणि हिरवा झेंडा दाखवून पहिली बस मार्गस्थ करण्यात आली.

नेरळ–वाकस–कशेळे मार्गावरील बससेवा बंद असल्याने गेली अनेक वर्षे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते.
ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन (रजि.) यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), कर्जत तालुका तसेच किसान क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य (कर्जत तालुका) यांनी सक्रिय पाठिंबा देत विविध स्तरांवर प्रयत्न केले. अखेर एसटी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत ही महत्त्वाची बससेवा पुन्हा सुरू केली.

पहिली बस मार्गस्थ होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. भर पावसातही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. अनेकांनी ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.
या बससेवेच्या पुनरारंभामुळे नेरळ, वाकस, कशेळे आणि परिसरातील गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासासाठी, नोकरदारांच्या दैनंदिन प्रवासासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः शासनाच्या महिला सन्मान योजनेमुळे महिला प्रवाशांनाही मोठा लाभ मिळणार असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्घाटन सोहळ्यास कर्जत प्रेस असोसिएशनचे विश्वस्त संतोष पेरणे, अध्यक्ष भूषण प्रधान, किशोर गायकवाड, कैलास म्हामले, रोशन दगडे, जगदीश दगडे, महेश भगत, रामदास माळी, संदेश साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच किसान क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत राणे, तालुकाध्यक्ष शरद तवले, काशिनाथ धुळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मारुती गायकवाड, सुरेखा कांबळे, भालचंद्र गायकवाड, सुभाष पवार, अनंत गायकवाड, रवींद्र गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
दरम्यान, या मार्गावरील पहिली बस चालक प्रशांत शिंदे यांनी चालविली, तर वाहक दीपा भवारे यांनी जबाबदारी सांभाळत पहिल्या फेरीची सेवा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यावेळी बस वाहक दीपा भवारे म्हणाल्या,
“आज नेरळ–कशेळे बससेवा पुन्हा सुरू झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. शासनाच्या महिला सन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याने अनेक महिला आणि विद्यार्थिनी अत्यंत आनंदी होत्या. एका फेरीत सुमारे ४५ ते ५० विद्यार्थी प्रवास करत होते. मुलींना मोफत प्रवासाची सुविधा मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. पहिल्याच दिवशी या बससेवेला नागरिकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला.”
या बससेवेच्या पुनरारंभामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय निर्माण होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








