कर्जतला ८ एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत सकारात्मक संकेत
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
रायगड-रत्नागिरीतील रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा
नरेश जाधव | कर्जत:
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात खासदार सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी, रेल्वे सेवांचा विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जत रेल्वे स्थानकावर आठ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी. या मागणीबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे कर्जत परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय, रोहा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत विकास व सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या योजनेमुळे स्थानकावर आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
बैठकीत रोहा–पनवेल दरम्यान वाढीव MEMU सेवा सुरू करणे, रत्नागिरी–दादर पॅसेंजर रेल्वे पूर्ववत सुरू करणे, मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेससाठी २० डब्यांचा रेक उपलब्ध करून देणे, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातून धावणाऱ्या मात्र या मतदारसंघात कुठेही थांबा नसलेल्या गाड्यांना किमान एक थांबा देणे, या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली.

तसेच दिवा–पेण–रोहा MEMU सेवा शनिवार आणि रविवारीही सुरू ठेवणे, सर्व MEMU गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढविणे, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सेवांचा विस्तार करणे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ, जलद आणि दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही करण्याची अपेक्षा खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनानेही विविध मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने रायगड-रत्नागिरीतील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वेळी खासदार सुनिल तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते महेंद्र चंदन, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, नगरसेवक कुमेश मोरे, पंकज पाटील, व्यापारी सुभाष सोलंकी, प्रकाश ओसवाल, कर्जत तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिपक श्रीखंडे, माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, नितीन परमार आदी मान्यवर उपस्थित होते.








