रितेश देशमुखांची उत्स्फूर्त दाद – “असा चित्रपट यापूर्वी कधीच पाहिला नव्हता!”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचे मराठीतील पहिले पाऊल !
मुंबईत दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत ‘लाडू’चा भव्य ग्रँड प्रीमियर संपन्न !
रायगडचे वादळ न्युज / मुंबई / कर्जत:
कर्जत तालुक्यातील रंगभूमीवर गेली तब्बल २२ वर्षे आपल्या अभिनयाची छाप पाडणारे प्रदिप सुलभा अरविंद गोगटे आता मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकण्यास सज्ज झाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते-दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांच्या पहिल्याच मराठी चित्रपट ‘लाडू’ मध्ये प्रदिप गोगटे यांनी साकारलेली ‘चंदू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत रंगू लागली आहे.
मुंबईतील लाईट बॉक्स एक्सेल एंटरटेनमेंट येथे २९ जुलै रोजी ‘लाडू’ चित्रपटाचा पहिला भव्य ग्रँड प्रीमियर मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्याला हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रीमियरचे विशेष आकर्षण ठरले देशाची आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची उपस्थिती. चित्रपट पाहिल्यानंतर रितेश देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरली. “मी असा चित्रपट यापूर्वी कधीच पाहिला नव्हता,” अशा शब्दांत त्यांनी ‘लाडू’चे आणि संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले.
भारतीय चित्रपटसृष्टीत २५ वर्षांचा यशस्वी प्रवास करणारे आणि तब्बल ७२ चित्रपटांची निर्मिती करणारे १२ राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग ‘लाडू’च्या माध्यमातून प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले असून, त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा असल्याचे प्रदिप गोगटे यांनी सांगितले.

चित्रपटातील ‘चंदू’ हे पात्र साकारताना दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी दिलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि विश्वास यामुळेच ही भूमिका प्रभावीपणे उभी करू शकलो, असे प्रदिप गोगटे नमूद करतात. तसेच या यशामागे आपल्या कुटुंबाची भक्कम साथ असल्याची भावनिक कबुलीही त्यांनी दिली.
या चित्रपटाच्या सहनिर्मात्या ऑस्कर नामांकन प्राप्त सोनिया नेसरी कोल असून, बॉस एंटरटेनमेंट आणि ब्रेडविनर प्रोडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
चित्रपटाचे पटकथा व गीतलेखन यज्ञेश दौंड यांनी केले असून, सहनिर्मात्या निलम लोहार आणि निकोल सॉटुंग आहेत. संगीतकार मंदार पाटील, छायांकन अर्शद खान, संकलक साहिल शेठ आणि ध्वनी संयोजन जिक्कु जोशी यांनी आपल्या कामातून चित्रपटाला वेगळी उंची दिली आहे. चित्रपटात एकूण नऊ दर्जेदार गाणी असून, त्यांचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

सत्य घटनेवर आधारित ‘लाडू’ हा चित्रपट भावनिक, प्रेरणादायी आणि सामाजिक आशय असलेला असल्याचे सांगितले जात असून, प्रीमियरनंतर उपस्थित कलाकार आणि मान्यवरांकडून चित्रपटाला भरभरून दाद मिळाली.
या प्रीमियरला मधुर भंडारकर, सुधांशू पांडे, रोहित रॉय, प्रमोद पाठक, पुष्कर जोग, अंशुमन विचारे, अमित भानुशाली, राजेश पुरी, श्रीनिवास नार्वेकर, राजश्री पोतदार, निशांत जोशी, विजय शिंदे, प्रताप फड, बेगम परवीन सुलताना यांच्यासह अनेक नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील कलावंताने राष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविल्याने संपूर्ण कर्जत तालुक्यातून प्रदिप गोगटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता सत्यघटनेवर आधारित ‘लाडू’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.








