मंडळ अधिकाऱ्यांच्या अटकेने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संताप
कर्जतसह जिल्हाभर आंदोलनाला जोरदार पाठिंबा
रविदास जाधव अटक प्रकरण तापले; रायगडातील महसूल कर्मचारी लेखणी बंद, बेमुदत संपाच्या तयारीत
नरेश जाधव / कर्जत:
पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ००८३/२०२६ मध्ये मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव यांना करण्यात आलेल्या थेट अटकेचा रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, अलिबाग यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. या कारवाईला बेकायदेशीर व एकतर्फी ठरवत संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून, मागण्या मान्य न झाल्यास २७ जुलै २०२६ पासून जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, मंडळ अधिकारी रविदास जाधव आणि ग्राम महसूल अधिकारी सतिश भानुदास ढवळे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महसूल विभागाच्या तांत्रिक बाबींची चौकशी न करता पोलिसांनी थेट अटकेची कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेले काम हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत शासकीय कर्तव्याचा भाग असल्याने अशा प्रकरणांमध्ये विभागीय चौकशीची प्रक्रिया अपेक्षित असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
संघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या अर्नेश कुमार प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांचा तसेच बीएनएस आणि सीआरपीसीमधील तरतुदींचा उल्लेख करत, सात वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये थेट अटक न करता प्रथम नोटीस देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. महसुली नोंदींबाबत आक्षेप असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम २४७ नुसार अपीलाची तरतूद असताना थेट फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे रविदास जाधव यांची तात्काळ सुटका, गुन्ह्याचा फेरविचार, निष्पक्ष तपासासाठी प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा किंवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करणे, तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, २६ जुलै रोजी कर्जत येथील प्रशासकीय भवनात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन सादर करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पोयनाड पोलीस ठाण्यातील कारवाईचा निषेध नोंदवत संघटनेच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, २६ जुलैपासून लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास २७ जुलैपासून रायगड जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनाचा परिणाम महसूल विभागाच्या दैनंदिन शासकीय कामकाजावर होण्याबरोबरच नागरिकांना मिळणाऱ्या विविध महसुली सेवांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आणि महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे कोणते वळण घेते, याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
संघटनेने या आंदोलनाची माहिती राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री, महसूल मंत्री, कोकण विभागीय आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेलाही दिली आहे.










