महिला आत अडकली, हाताला दुखापत
दिगंबर चंदने / माथेरान:
काही दिवसांपूर्वी माथेरान येथील प्रसिद्ध एको पॉईंट परिसरातील ई-टॉयलेटमध्ये एक महिला आतून कडी उघडता न आल्याने बराच वेळ अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने महिलेच्या पतीने प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली.
मात्र, बाहेर पडण्याच्या प्रयत्नात महिलेच्या हाताला दुखापत झाली. या घटनेमुळे ई-टॉयलेटच्या देखभाल व सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पर्यटनस्थळी दररोज हजारो पर्यटक येत असताना अशा सार्वजनिक सुविधांची नियमित तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन ई-टॉयलेटची तातडीने तपासणी करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.







