सुरेल गीतांची मेजवानी
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व उषःकाल मराठी वाद्यवृंदाचा पुढाकार
प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी यांची विशेष उपस्थिती
नरेश जाधव | कर्जत, रायगड:
दिवाळीचा उत्साह, सुरेल गाण्यांची मैफल आणि संगीताचा आनंद अनुभवण्याची संधी कर्जतकरांना मिळणार आहे. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व उषःकाल मराठी वाद्यवृंद, कर्जत यांच्या सौजन्याने दिवाळीनिमित्त ‘दिवाळी संध्या २०२६’ या भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.
कर्जत येथील प्रति पंढरपूर, आळंदी येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढले आहे.

या सांगीतिक मैफलीमध्ये गायक आनंदा कुलकर्णी, अजय जोशी, श्रीरंग वैद्य तसेच गायिका कल्पना क्षिरसागर, फाल्गुनी जोशी-नातू आणि आयुषी देशमुख आपल्या सुरेल आवाजातून रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन राहुल वैद्य आणि वृषाली वैद्य करणार असून, संगीताची साथ देण्यासाठी कीबोर्डवर उदय चितळे, तबल्यावर सौरभ पैठणकर, बासरीवर प्रतीक गांगल, पखवाजवर कौशिक वांजळे, तर साईड रिदमसाठी संतोष मालगुंडकर आणि हर्षवर्धन देशमुख उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन केतन गडकरी यांनी केले असून, शरद सरवदे आणि अमोल हजारे यांचे सहकार्य लाभणार आहे.
दिवाळीच्या मंगलमय वातावरणात संगीताचा आनंद लुटता यावा, यासाठी सर्व संगीतप्रेमी, नागरिक आणि रसिक प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘दीपांच्या प्रकाशात उजळू दे आनंदाचे क्षण, सुरांच्या मैफलीत रंगू दे दिवाळीचा सण!’ या संकल्पनेतून कर्जतकरांची दिवाळी यंदा सुरांच्या साथीने साजरी होणार आहे.








