कर्नल नीरज शर्मा यांची घाटकोपरमधील नावनोंदणी व जनजागृती शिबिराला सदिच्छा भेट
जागेवरच मोफत नोंदणी व कार्ड वितरणाची सुविधा
श्रीकांत खुपेरकर | मुंबई
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारचे महासंचालक कर्नल नीरज शर्मा यांनी मुंबईतील घाटकोपर, भटवाडी येथील संत मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नाव नोंदणी व जनजागृती शिबिराला सदिच्छा भेट देऊन शिबिराच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिबिराच्या माध्यमातून कष्टकरी, श्रमिक व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी व्यासपीठावर संत मुक्ताबाई हॉस्पिटलचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अजित कवठेकर, प्रादेशिक संचालक रमेश मडावी आणि शिक्षणाधिकारी व प्रकल्प प्रमुख डॉ.चंद्रसेन जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
संत मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये परिसरातील हजारो कष्टकरी कामगार व सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय उपचार, विविध आरोग्यविषयक तपासण्या तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक कल्याणकारी योजनांचा लाभही या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाच्या पुढाकारातून अशा जनजागृती व नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

भारत सरकारच्या विविध उपक्रमांतर्गत आभा (ABHA) हेल्थ कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) नोंदणी, जॉब कार्ड तसेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यांसारख्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्यांची पात्रतेनुसार मोफत नाव नोंदणी करून देण्यात येत आहे. संबंधित लाभार्थ्यांना आवश्यक कार्ड व नोंदणीची सुविधा निशु:ल्कपणे शिबिराच्या ठिकाणीच उपलब्ध करून दिली जात आहे.
गेल्या वर्षापासून बोर्डाच्या वतीने हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत असून, शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्या कामगार आणि असंघटित क्षेत्रातील नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती व लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बोर्डाने ‘श्रमिक मित्र’ ही संकल्पना विकसित केली असून, नव्याने श्रमिक मित्रांची निवड करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षित श्रमिक मित्रांच्या माध्यमातून प्रादेशिक संचालनालयाच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा व तालुका स्तरावर जनजागृती, नाव नोंदणी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कर्नल नीरज शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.
हॉस्पिटलच्या वतीने डॉ. अजित कवठेकर यांनी कर्नल नीरज शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांसाठीही विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी विनंती डॉ. कवठेकर यांनी केली.
या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देताना कर्नल शर्मा यांनी सांगितले की, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आवश्यक कौशल्यविकास, प्रशिक्षण व जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासाठी बोर्ड निश्चितच सहकार्य करेल. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शासकीय रुग्णालयांमध्येही अशा प्रकारच्या सेवा व उपक्रम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी व त्यांना प्रत्यक्ष लाभ घेता यावा, यासाठी अधिक व्यापक स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
या दोन दिवसीय शिबिरामुळे परिसरातील कष्टकरी कामगार, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष नाव नोंदणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांची सांगड घालणारा हा उपक्रम कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रमिक मित्र सौ. अर्पिता व्होरा व देवेंद्र मडे सर तसेच बालाजी घुमटदार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिबिराचे आयोजन प्रभावीपणे पार पडले.







