‘जंगल वाचवा, कर्जत वाचवा’च्या निर्धाराने कर्जत बंदचे आवाहन
जंगल, पाणी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कर्जत बंदमध्ये सहभागी व्हा – ॲड. कैलास मोरे
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
राजकीय, जातीय आणि धार्मिक मतभेद बाजूला ठेवून संविधानिक मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे आवाहन

कर्जत तालुक्यातील निसर्ग, जंगल, जलस्रोत आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पर्यावरण संवर्धनाच्या मागणीसाठी सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण कर्जत तालुका बंद ठेवण्याचे आवाहन कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कर्जतच्या पर्यावरण रक्षणासाठी या बंदमध्ये सर्व नागरिकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

कर्जत ही केवळ आपली राहण्याची जागा नसून ती आपली माती, आपली ओळख, आपला इतिहास आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य आहे. मात्र, आज कर्जतच्या निसर्गावर, जंगलावर, पाण्याच्या स्रोतांवर आणि पर्यावरणावर विविध संकटे निर्माण होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. या संकटांकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना हिरवेगार डोंगर, वाहत्या नद्या आणि स्वच्छ हवा केवळ आठवणींतूनच अनुभवावी लागेल, अशी भावना समितीने व्यक्त केली आहे.

हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा नसून कर्जतच्या अस्तित्वाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या हक्काचा आहे! अशी भूमिका समितीने मांडली आहे. त्यामुळे कर्जतच्या हितासाठी पुकारण्यात आलेल्या या बंदला पाठिंबा देताना नागरिकांनी आपापले राजकीय, सामाजिक आणि अन्य मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज कर्जतच्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण एकत्र उभे राहिलो, तरच उद्याच्या पिढ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि हिरवेगार कर्जत देण्याची जबाबदारी आपण पार पाडू शकू. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ एखाद्या संघटनेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, असा संदेशही समितीने दिला आहे.

त्यामुळे २ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या संपूर्ण कर्जत तालुका बंदमध्ये सर्व कर्जतकर नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संस्था, तरुण मंडळी आणि पर्यावरणप्रेमींनी कोणत्याही प्रकारचे मतभेद न ठेवता संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या या लढ्याला आपले योगदान द्यावे, असे आवाहन कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जंगल वाचवा, कर्जत वाचवा!
कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती








