रोजगार, पर्यावरण आणि नदीपात्रातील अतिक्रमणावर संघर्ष कधी?
नरेश जाधव / कर्जत–खालापूर:
कर्जत आणि खालापूर तालुक्यात सध्या विकासाच्या मुद्द्यांवरून राजकीय-सामाजिक पातळीवर विविध दावे आणि आश्वासने केली जात असताना, स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष संघर्ष आणि ठोस कृती कधी होणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
विशेषतः स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, रोजगारनिर्मितीबाबत ठोस भूमिका घेण्याऐवजी केवळ आश्वासने देऊन प्रश्न मार्गी लागणार नाहीत, अशी भावना युवकांमध्ये व्यक्त होत आहे. “रोजगार हवा, आश्वासन नको” अशी भूमिका घेत स्थानिक युवकांसाठी प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
दुसरीकडे नदीपात्रांमध्ये होणारे माती भराव, बांधकामे आणि कथित अतिक्रमणे याकडेही नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. नदी, नाले आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याची भूमिका घेणारे पर्यावरणप्रेमी आणि नदी संवर्धनासाठी कार्यरत संस्था या प्रश्नांवर ठोसपणे आवाज का उठवत नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.
नदी-नाल्यांमध्ये अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे तसेच दूषित पाणी सोडण्याच्या प्रकारांवर कारवाईची मागणी सातत्याने होत असताना, संबंधित प्रशासनाने याबाबत पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली केवळ प्रसिद्धी न करता प्रत्यक्ष नदीपात्र, नाले आणि जलस्रोत वाचविण्यासाठी मैदानात उतरावे, अशी मागणीही पुढे येत आहे.
याचबरोबर पत्रकार परिषदांमध्ये स्थानिक आणि प्रामाणिक पत्रकारांना योग्य स्थान दिले जाते का? हा प्रश्नही आता चर्चेत आला आहे. काही मोजक्या व्यक्तींना जवळ करून पत्रकारिता किंवा जनतेच्या प्रश्नांना आपल्या सोयीने दिशा देण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र, पत्रकारितेचे मूलभूत काम म्हणजे सत्ताधारी असो वा विरोधक—सर्वांना प्रश्न विचारणे आणि जनतेचा आवाज मांडणे, हेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“नियम सर्वांसाठी समान असावेत; रोजगार हमी असो किंवा विकासकामे, त्यात पारदर्शकता आणि समान संधी मिळाली पाहिजे,” अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
कर्जत–खालापूरच्या जनतेला विकास हवा आहे; केवळ आश्वासने आणि घोषणांचा पाऊस नको. “खोटे बोला पण रेटून बोला” या प्रकारचे राजकारण जनतेला किती काळ फसवणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
जनतेचा विकास की स्वतःचा विकास? हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे. राजकीय, सामाजिक किंवा पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्ती कोणतीही असो, त्यांच्या भूमिकेचा आणि कार्याचा अंतिम हिशोब जनताच घेते. आज काही प्रश्न दडपले गेले किंवा दुर्लक्षित झाले तरी उद्या त्यामागचे सत्य समोर येणारच, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
त्यामुळे कर्जत–खालापूरच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पारदर्शकता, स्थानिक युवकांचा रोजगार, नदीपात्रातील माती भराव व बांधकामे, अतिक्रमणे, जलप्रदूषण आणि पर्यावरण संवर्धन या सर्व प्रश्नांवर संबंधितांनी ठोस भूमिका घ्यावी आणि जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जनतेला विकास हवा; आश्वासन नको.
प्रश्न कोणाचा आहे यापेक्षा प्रश्न योग्य आहे का, हे महत्त्वाचे—आणि त्याचे उत्तर आज ना उद्या जनतेसमोर येणारच.







