ओसाड जागेला मिळणार हिरवाईचे रूप
ग्रामस्थांसह चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नरेश जाधव | कर्जत:
पर्यावरण संवर्धनाबरोबरच गावातील उपलब्ध जागेचा विधायक उपयोग करून परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने किरवली येथे श्री श्री रविशंकर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २०० फळझाडांची लागवड करण्यात आली. गावामागील ओसाड जागेवर राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमाला ग्रामस्थ, महिला, लहान मुले तसेच ट्रस्टच्या सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
किरवली गावामागील ओसाड जागेचा सदुपयोग व्हावा, परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई निर्माण व्हावी, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि भविष्यात या फळझाडांमुळे ग्रामस्थांना फळांचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी सहभागी नागरिकांनी केला.
या उपक्रमात श्री श्री रविशंकर ट्रस्टचे सहकारी, किरवली ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गावातील ओसाड जागेवर फळझाडांची लागवड झाल्याने आगामी काळात हा परिसर हिरवाईने नटणार असून, पर्यावरणासोबतच ग्रामस्थांना त्याचा उपयोग होणार आहे.
‘आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी हिरवाई, शुद्ध हवा आणि समृद्धीची भेट’, या भावनेतून या उपक्रमाकडे पाहण्यात आले.
या वृक्षलागवड उपक्रमासाठी श्री श्री रविशंकर ट्रस्टतर्फे राजेश खन्ना, श्रीमती वीणा आणि श्रीमती नीता, तसेच पनवेल फॉरेस्ट ऑफिसच्या वनरक्षक श्रीमती पूनम वरखडे यांचे सहकार्य लाभले.
याशिवाय राष्ट्रीय खेळाडु, क्रीडाप्रशिक्षक श्रीमती रेखा चव्हाण यांच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर ट्रस्टशी संपर्क होण्यास मदत झाली. तसेच किरवली ग्रामस्थ मंडळी, पोलीस पाटील विवेक बडेकर, माजी उपसरपंच संजय बडेकर आणि वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले शरद पवार यांचेही बहुमोल सहकार्य लाभले.
वृक्षलागवड उपक्रमात लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला. चंद्रमौलिन, ईशान्वी, रियांश, गंधर्व आणि गंधार या चिमुकल्यांनी वृक्षलागवडीत सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.
लहान वयातच मुलांमध्ये वृक्ष, पर्यावरण आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
वृक्षारोपण करणे ही सुरुवात असून, लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन करणे ही खरी जबाबदारी आहे. त्यामुळे या परिसरात लावण्यात आलेल्या फळझाडांची योग्य निगा राखून ती मोठी करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.







