निकृष्ट कामांची चौकशी करा – ॲड. संकेत भासे
लाखो रुपये खर्चूनही रस्ते काही दिवसांतच उखडले
कर्जत नगरपरिषदेच्या कामांवर प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या पैशांचा अपव्यय खपवून घेणार नाही; दोषींवर कारवाईची मागणी
कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यात करण्यात आलेल्या दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाच्या कामांचा दर्जा संशयास्पद असल्याचा आरोप नगरसेवक तथा गटनेते ॲड. संकेत जनार्दन भासे यांनी केला आहे. लाखो रुपये खर्च करून केलेली कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अनेक ठिकाणी रस्ते पुन्हा खराब झाले असून डांबरीकरण उखडणे, खडी बाहेर येणे आणि रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीतून सार्वजनिक कामे केली जातात. मात्र, कामे पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होत असेल, तर संबंधित कामांची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामावर करण्यात आलेली देखरेख याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवालही ॲड. भासे यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मागील कालावधीत करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाच्या सर्व कामांची स्वतंत्र तांत्रिक यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ॲड. संकेत भासे यांनी केली आहे.
या चौकशीमध्ये संबंधित कामांचे अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर, वापरण्यात आलेले साहित्य, मोजमाप पुस्तिका, बिलांची नोंद, गुणवत्ता तपासणी अहवाल तसेच प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
चौकशीत संबंधित कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे निष्पन्न झाल्यास ठेकेदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी अथवा अन्य जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी. तसेच नगरपरिषदेच्या निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नागरिकांच्या पैशांचा अपव्यय खपवून घेतला जाणार नाही
“नगरपरिषदेचा निधी हा कर्जतकरांच्या करातून निर्माण होतो. त्यामुळे सार्वजनिक निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामात पारदर्शकता, गुणवत्ता आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. निकृष्ट कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल तर हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा ॲड. संकेत जनार्दन भासे यांनी दिला.
प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तांत्रिक चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार पुनर्दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ॲड. भासे यांनी केली आहे.
या संदर्भात कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्जत शहरात करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित कामांची योग्य पद्धतीने तपासणी व चौकशी करण्यात येणार असून, काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारामार्फत ते काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.







