अवंतिकाबाई गोखले ते हरित क्रांतीपर्यंत विषयांवर विद्यार्थ्यांची दमदार मांडणी
स्वातंत्र्यसैनिक डोंबे विद्यानिकेतन व रोटरी क्लब ऑफ कर्जतचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ
नरेश जाधव / कर्जत
९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने कर्जत तालुका विविध कार्यकारी प्राथमिक शिक्षक मंडळाचे स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतन आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कर्जत तालुक्यातील १० शाळांमधील तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सकाळच्या सत्रातील स्पर्धेचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष माधवजी भडसावळे यांच्या हस्ते झाले. तर दुपारच्या सत्रात संस्थेचे कार्याध्यक्ष मुकुंद मेढी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जतचे अध्यक्ष नितीन आहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे खजिनदार व रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दीपचंद जैन, शालेय समिती सदस्या रोहिणी जोशी, शाळेस सदैव सहकार्य करणारे समीर डोंबे तसेच रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वक्तृत्व स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. गट क्रमांक १ मध्ये ‘अवंतिकाबाई गोखले’ हा विषय देण्यात आला. या गटात विद्या विकास मंदिर, नेरळ येथील कुमार स्वराज संदीप ढमाल याने प्रथम क्रमांक पटकावला. याच शाळेची कुमारी श्रुती जयदास शेळके हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर गीता इंग्लिश मीडियम स्कूल, खांडपे येथील कुमारी श्रुती शरद कुंभार हिने तृतीय क्रमांक मिळवला.
गट क्रमांक २ मध्ये ‘अंतराळ क्षेत्रातील क्रांती’ हा विषय होता. स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनच्या कुमारी सायली प्रथमेश पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल, पोसरी येथील कुमारी स्वराली विनायक गायकवाड हिने द्वितीय, तर विद्या विकास मंदिर, नेरळ येथील कुमारी प्रांजल प्रफुल्ल कारुळकर हिने तृतीय क्रमांक मिळवला.

गट क्रमांक ३ मध्ये ‘हरितक्रांती – पर्यावरण संरक्षण काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या कुमारी अदिती अनिल शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला. अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला, कर्जत येथील कुमारी तन्मयी दिनेश शेठ हिने द्वितीय, तर याच शाळेचा कुमार साहिल अशोक शिनारे याने तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापिका मीरा कडू यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्राथमिक मुख्याध्यापिका माया म्हसे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजू शेळके यांनी केले, तर बक्षीस वाचनाची जबाबदारी जागृती दाभाडे यांनी पार पाडली. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणविषयक विषयांवर प्रभावीपणे विचार मांडत आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली. विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.







