चौक-मोहपाडा-रसायनी-कर्जत शाखेचा वर्धापन दिन उत्साहात
गीत, खेळ आणि स्नेहमेळाव्यातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा वर्धापन दिन साजरा
नरेश जाधव | कर्जत:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धापन दिनानिमित्त चौक, मोहपाडा, रसायनी व कर्जत शाखेच्या वतीने कुटुंब स्नेह मेळावा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीशी जोडलेल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला साथी आरती नाईक (राज्य सचिव) यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धापन दिनाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच समितीच्या कार्याची दिशा, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे महत्त्व आणि अंधश्रद्धेविरोधातील चळवळीची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी साथी संदीप गायकवाड (कार्याध्यक्ष, रायगड जिल्हा) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विविध टप्प्यांवर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मेळाव्यात चौक, मोहपाडा, रसायनी आणि कर्जत शाखेच्या वतीने वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती उपस्थितांसमोर मांडण्यात आली. शाखांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधनासाठी करण्यात आलेल्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.
त्यानंतर उपस्थित सर्व कार्यकर्ते व कुटुंबीयांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे तसेच सर्व साथींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कुटुंब स्नेह मेळाव्यात कांबळे मॅडम आणि आदित्य ढोले यांनी विविध खेळांचे आयोजन केले. या खेळांमध्ये कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गीत, खेळ, परिचय आणि स्नेहसंवादामुळे मेळाव्याला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला.
कर्जत शाखेचे कार्यकर्ते विकास ज. वाल्हे यांच्या मुलीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
तसेच प्रा. विजय कोंडिलकर यांच्या मुलीने B.Sc. Agri. (कृषी) अभ्यासक्रमात ९१ टक्के गुण मिळविल्याबद्दल तिचाही यावेळी सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कारामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक चळवळीबरोबरच शिक्षण आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साथी राकेश कांबळे, आदित्य ढोले तसेच चौक शाखेतील इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कुटुंब स्नेह मेळावा आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी कर्जत शाखेचे अध्यक्ष विलास सांगळे यांनी उपस्थित पाहुणे, कार्यकर्ते, कुटुंबीय आणि आयोजकांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सदर प्रसंगी कर्जत शाखेचे विलास विठ्ठल सांगळे अध्यक्ष, सूर्यकांत भुतावळे कार्याध्यक्ष, विकास ज. वाल्हे सचिव, कविता व. वाल्हे, रेश्मा शमशाद हमिद, प्रशांत शिंदे, चेतन कटके, अविनाश दोंदे, कोमल दोंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अंधश्रद्धेविरोधी लढा अधिक व्यापक करत वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा निर्धार या कुटुंब स्नेह मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.







