विशेष बैठक घेण्याचे अमित शाहांचे आश्वासन
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क / नवी दिल्ली:
पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू असून, या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमितजी शाह यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील सदाशिव गोगटे यांनी दिली.
पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना केंद्र सरकारच्या २०२० मधील नियमानुसार कमाल पाच लाख रुपयांपर्यंतचे ठेवी विमा संरक्षण मिळावे, यासाठी गोगटे यांनी यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री, तत्कालीन अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या प्रश्नासंदर्भात काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे माननीय खासदार डॉ. अनिलजी बोंडे यांची भेट घेऊन गोगटे यांनी सविस्तर चर्चा केली. यापूर्वीही डॉ. बोंडे यांनी पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
दरम्यान, डॉ. बोंडे यांनी गोगटे यांना या विषयावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी स्वतः चर्चा करून सहकार मंत्रालय व अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार डॉ. अनिल बोंडे यांनी आज केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शाह यांची सपत्नीक सदिच्छा भेट घेतली. यावेळी अमरावती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा केली.
पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळण्यासाठी संबंधित मंत्रालयांची विशेष बैठक आयोजित करून या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी विनंती डॉ. बोंडे यांनी अमित शाह यांच्याकडे केली. त्यावर अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधितांची बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या सकारात्मक घडामोडीमुळे पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून, केंद्र सरकारच्या पातळीवर या प्रश्नाचा गांभीर्याने विचार सुरू झाल्याचे चित्र आहे.
“पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचा प्रश्न हा केवळ आर्थिक विषय नसून हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी निगडित आहे. ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. डॉ. अनिल बोंडे साहेबांनी हा विषय अमितजी शाह यांच्याकडे प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार,” असे सुनील गोगटे यांनी सांगितले.







