पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नामफलक वापरण्याचा मुद्दा ऐरणीवर
राज्यातील पोलीस आयुक्त व अधीक्षकांना पत्र
नरेश जाधव | मुंबई:
पोलिस अधिकारी अथवा अंमलदारांनी आपल्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांवर ‘पोलीस’ असा लाल रंगाचा नामफलक अथवा लाल अक्षरांत ‘पोलीस’ लिहिलेला फलक लावून वाहन चालविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा वाहनांचा गैरवापर करून कायद्याचे उल्लंघन, अवैध वस्तूंची वाहतूक किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाकडून दि. ३१ जुलै २०२६ रोजी राज्यातील विविध पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रामुळे खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नामफलक लावण्याच्या प्रथेबाबत पोलिस प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. सखाराम कुलकर्णी यांनी याबाबत दि. २७ जून २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. पोलिस अधिकारी व अंमलदार आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून वाहने चालवत असल्याने सामान्य वाहनांपेक्षा अशा वाहनांना वेगळे महत्त्व मिळते आणि अनेकदा तपासणी टाळली जाते, असा मुद्दा त्यांनी तक्रारीत उपस्थित केला होता.
सदर तक्रार मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या कार्यालयाकडून ई-मेलद्वारे संबंधित अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन राज्यातील संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘पोलीस’ पाटीमुळे वाहनांची तपासणी टाळली जाते?
तक्रारीनुसार, खासगी वाहनावर ‘पोलीस’ अशी पाटी असल्यामुळे काही ठिकाणी त्या वाहनाची तपासणी केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अशा वाहनांना पोलिसांचे वाहन समजून सामान्य नागरिक किंवा संबंधित यंत्रणांकडून वेगळ्या पद्धतीने वागणूक मिळण्याची शक्यता असते.
याचा गैरफायदा घेऊन काही व्यक्तींकडून अवैध वस्तूंची ने-आण, नियमबाह्य कामे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाचा फलक लावून वाहन चालविणाऱ्यांवर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली होती.
न्यायालयीन निर्देशांचाही उल्लेख
पत्रामध्ये उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे. खासगी वाहनांवर ‘पोलीस’ असा नामफलक वापरण्याच्या प्रकाराबाबत यापूर्वीच न्यायालयीन पातळीवर आक्षेप नोंदविण्यात आले असल्याचे पत्रात नमूद आहे.
त्यानुसार ‘पोलीस’ पाटी अथवा वाहनावर ‘पोलीस’ असे नाव दिसून आल्यास संबंधित वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईची मागणी
तक्रारदाराने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील कलम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १७७ याअन्वये संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने या तक्रारीची मूळ प्रत पुढील योग्य कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयांकडे पाठविली असून, ‘योग्य ती कार्यवाही करण्यात यावी’, असे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना पत्र
या पत्राची प्रत राज्यातील विविध पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलिसांच्या संबंधित परिक्षेत्रांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित न राहता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

खासगी वाहन म्हणजे खासगी वाहन आणि शासकीय कर्तव्यावरील अधिकृत पोलिस वाहन म्हणजे अधिकृत वाहन, यातील फरक स्पष्ट राहणे आवश्यक आहे. खासगी वाहनावर ‘पोलीस’ अशी लाल पाटी लावून त्याचा गैरवापर होत असल्यास त्यावर कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका या तक्रारीतून पुढे आली आहे.
दरम्यान, अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने संबंधित पोलीस आयुक्त व अधीक्षकांकडे तक्रार पाठवून कारवाईचे निर्देश दिल्याने आता खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नामफलक वापरणाऱ्या वाहनचालकांवर प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







