रविवारी होणारे दोन्ही स्पेशल स्क्रिनिंग हाऊसफुल्ल; कर्जतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री विठ्ठल मंदिराच्या रंगमंचापासून राज सिनेप्लेक्सपर्यंत… प्रदीप गोगटेंचा २२ वर्षांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर
नरेश जाधव | कर्जत:
कर्जतच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. कर्जतच्या मातीत घडलेल्या आणि कर्जतशी नाळ जोडलेल्या प्रदीप गोगटे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाडू’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन रविवारी, २३ ऑगस्ट रोजी राज सिनेप्लेक्स, कर्जत येथे होणार आहे. विशेष म्हणजे, कर्जतच्या इतिहासात प्रथमच कर्जतच्या कलाकाराची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग कर्जतमध्ये होत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते-दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून, या चित्रपटात प्रदीप गोगटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यामुळे कर्जतकरांसाठी हा केवळ एका चित्रपटाचा शो नसून, आपल्या मातीतल्या कलाकाराच्या २२ वर्षांच्या संघर्षाचा आणि स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव ठरणार आहे.

प्रदीप गोगटे यांच्या कलाप्रवासाची सुरुवात २००४ मध्ये श्री विठ्ठल मंदिराच्या स्टेजवरील पहिल्या नाटकापासून झाली. तेथून सुरू झालेला हा प्रवास तब्बल २२ वर्षे अखंड सुरू राहिला. रंगभूमी, अभिनय आणि चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली.
२००४ मधील पहिल्या नाटकापासून २०२६ मधील राज सिनेप्लेक्समधील पहिल्या चित्रपटापर्यंतचा हा केवळ पाच मिनिटांचा पडद्यावरील प्रवास नाही; त्यामागे २२ वर्षांची तपश्चर्या, संघर्ष, सातत्य आणि असंख्य प्रयत्न आहेत. आज त्या मेहनतीला ‘लाडू’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर स्थान मिळाले आहे.
आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना प्रदीप गोगटे यांनी सांगितले की, “आई, वडील, बहीण माधुरी आणि भाऊ दिलीप यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ही लढाई मी यशस्वीपणे लढू शकलो. माझ्या कुटुंबाने प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली. त्यामुळे आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा आहे.”
कलाक्षेत्रातील प्रवासात अनेक अडचणी आणि आव्हाने आली; मात्र कुटुंबाची साथ आणि अभिनयाची आवड यामुळे त्यांनी आपला संघर्ष अखंड सुरू ठेवला.
शैलेंद्र सिंग यांच्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते-दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दलही प्रदीप गोगटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“शैलेंद्र सिंग यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि विश्वासामुळे मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी ही मोठी जबाबदारी आणि त्याचबरोबर अभिमानाची बाब आहे,” असे प्रदीप गोगटे यांनी यावेळी सांगितले.
रविवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता राज सिनेप्लेक्स, कर्जत येथे ‘लाडू’चे दोन विशेष शो आयोजित करण्यात आले आहेत. या दोन्ही स्पेशल स्क्रिनिंगला कर्जतकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन्ही शो हाऊसफुल्ल केले आहेत.

कर्जतच्या कलाकाराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कर्जतकरांनी दाखवलेला हा प्रतिसाद प्रदीप गोगटे यांच्या २२ वर्षांच्या मेहनतीला मिळालेली कौतुकाची आणि प्रेमाची पावती मानली जात आहे.
या विशेष स्क्रिनिंगच्या आयोजनासाठी कर्जतच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि व्यावसायिकांनीही सहकार्य केले आहे. ऋषभ सुपर मार्केट, स्वर्ण भैरव ज्वेलर्स, माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, डिझाईन हब स्टुडिओ आणि पारस क्लॉथ स्टोअर्स यांनी या उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे.
कर्जतच्या कलाकाराच्या यशाचा आनंद कर्जतकरांनी एकत्रितपणे साजरा करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
रंगमंचावर सुरू झालेल्या एका कलाकाराच्या स्वप्नाला २२ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर स्थान मिळाले आहे. आता कर्जतकरांच्या टाळ्यांची दाद या स्वप्नाला आणखी बळ देणार आहे. ‘लाडू’च्या निमित्ताने कर्जतच्या कलाक्षेत्रातील हा ऐतिहासिक क्षण रविवारी राज सिनेप्लेक्समध्ये अनुभवायला मिळणार आहे.







