पोलीस चौकी असूनही वाहतूक व्यवस्था रामभरोसे
व्यापारी, पर्यटक, वाहनधारक आणि नागरिक त्रस्त
रजनीकांत पवाळी | कडाव:
कर्जत तालुक्यातील धार्मिक, पर्यटन तसेच मोठ्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या कडाव गावात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असताना वाहनांची संख्या वाढत असल्याने कडाव परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक, व्यापारी, पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
कडाव गावात पोलीस चौकी अस्तित्वात असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अथवा वाहतूक पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उपलब्ध नसल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाढती वाहतूक, रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने, रिक्षांची वर्दळ आणि अवजड वाहनांची ये-जा यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.

अवजड वाहनांसह पर्यटकांच्या वाहनांचीही मोठी वर्दळ
मुंबई व पुणे परिसरातून मुरबाडच्या दिशेने जाणारी अवजड वाहने, कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येणारी पर्यटकांची वाहने तसेच कडावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने यामुळे कडावमध्ये दिवसभर वाहनांची मोठी गर्दी असते.
त्यातच रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक वेळा एखादे वाहन रस्त्याच्या कडेला थांबले किंवा चुकीच्या पद्धतीने पार्क झाले तरी त्याचा परिणाम संपूर्ण वाहतुकीवर होत असल्याचे दिसून येते.

पादचारी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहिलेला नसून पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. गर्दीच्या वेळी रस्त्यावरून चालणेही अवघड होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक नियमनासाठी कर्मचारी उपलब्ध असल्यास वाहने शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ होण्यास मदत होऊ शकते. मात्र प्रत्यक्षात वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलीस अथवा वाहतूक कर्मचारी दिसत नसल्याने वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम पाळण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सणासुदीत परिस्थिती अधिक गंभीर
सणासुदीच्या काळात कडाव परिसरात नागरिकांची आणि वाहनांची संख्या नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि पार्किंगचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र आवश्यक त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वाहतूक नियोजनाची ठोस गरज
कडाव हे धार्मिक, पर्यटन आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन, रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा, महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती तसेच गर्दीच्या वेळेत विशेष वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस चौकी असूनही वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण मिळत नसेल, तर या चौकीचा उपयोग नेमका काय? असा सवालही संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कडावमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी, नागरिक, वाहनधारक आणि पादचाऱ्यांकडून होत आहे.







