१२ वर्षांपासून व्यवहार रखडल्याचा दावा
कुष्ठाश्रमात बालपण गेलेल्या शेतकऱ्याची न्यायासाठी धडपड
हक्काची जमीन मिळाली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही – पीडित मुकुंद कांबरी यांची प्रशासनाकडे धाव
नरेश जाधव | कर्जत, रायगड:
बालपणीच पितृछत्र हरवलेल्या आणि नाशिक येथील संत गाडगेमहाराज कुष्ठाश्रमात वाढलेल्या एका गरजू शेतकऱ्याने आपल्या वडिलोपार्जित जमिनीच्या व्यवहारावरून सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार तासगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१५ मध्ये जमिनीच्या व्यवहारासाठी नोंदणीकृत साठेखत आणि कायमस्वरूपी कुळमुखत्यारपत्र करूनही निर्धारित मुदतीत व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही. तब्बल १२ वर्षे उलटूनही पैसे किंवा जमीन मिळाली नसल्याने आपल्यावर आर्थिक व मानसिक संकट ओढवले असल्याचे पीडित शेतकरी मुकुंद कांबरी यांनी म्हटले आहे.
बालपण संघर्षात; मुलाच्या भविष्यासाठी केला जमिनीचा व्यवहार
मुकुंद कांबरी यांच्या म्हणण्यानुसार, ते अवघ्या सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना कुष्ठरोग झाला. त्यामुळे समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानंतर वडिलांचे निधन झाले. पुढे मोठे झाल्यानंतर त्यांना आपल्या वडिलोपार्जित जमिनीची माहिती मिळाली. मुलाच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये नंदकुमार तासगावकर यांच्यासोबत जमिनीचा व्यवहार केला.
या व्यवहारानुसार नोंदणीकृत साठेखत आणि कायमस्वरूपी कुळमुखत्यारपत्र करण्यात आले होते. करारातील अटींनुसार तीन वर्षांच्या आत संपूर्ण रक्कम अदा करून व्यवहार पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, ठरलेली मुदत संपूनही व्यवहार पूर्ण झाला नसल्याचा आरोप कांबरी यांनी केला आहे.
१२ वर्षांपासून व्यवहार रखडल्याचा आरोप; कायदेशीर नोटिशींनाही प्रतिसाद नसल्याचा दावा
करारानुसार तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असलेला व्यवहार अनेक वर्षे रखडला असून, काही रक्कम देऊन प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आल्याचे कांबरी यांचे म्हणणे आहे. जमिनीच्या व्यवहाराबाबत विचारणा करण्यासाठी नाशिकहून वारंवार यावे लागले. संबंधित कार्यालयाबाहेर तासनतास बसावे लागले आणि अपमानास्पद वागणूक सहन करावी लागल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याशिवाय, कायदेशीर नोटिसा पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे कांबरी यांनी सांगितले. जमिनीच्या व्यवहाराबाबत विचारणा केल्यानंतर धमकीवजा वक्तव्य करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. या आरोपांबाबत संबंधित अध्यक्षांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
आजच्या बाजारभावाने पैसे द्या किंवा करार रद्द करा
आपली वडिलोपार्जित जमीन अथवा त्याबदल्याची ठरलेली रक्कम मिळत नसल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे कांबरी यांनी सांगितले. व्यवहार पूर्ण करायचा नव्हता, तर इतकी वर्षे आपल्याला आशेवर का ठेवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“आजच्या बाजारभावानुसार पैसे द्या किंवा आमचा करार रद्द करा. त्यासाठी यापूर्वी घेतलेली थोडीफार रक्कम परत करण्यासही आम्ही तयार आहोत,” अशी भूमिका मुकुंद कांबरी यांनी मांडली आहे.
आपल्या हक्काची जमीन परत मिळाली नाही, तर जगण्याचा मार्ग उरणार नसल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आत्महत्येचा इशाराही दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, संबंधित व्यवहाराची चौकशी करावी आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का?
एका गरजू शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीच्या व्यवहाराबाबत उपस्थित झालेल्या या गंभीर आरोपांमुळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. करारातील अटी, जमिनीच्या नोंदी, प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.







