‘प्रति अयोध्या’ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
गणेश विसर्जनासाठी GSB भरून रस्ताही केला सुकर
नरेश जाधव | कर्जत:
दहिवली येथील ‘प्रति अयोध्या’ परिसरातील सुरक्षितता आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन गटनेते तथा नगरसेवक ॲड. संकेत भासे आणि नगरसेविका जान्हवी सुदेश देवघर यांनी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. तसेच दहिवली गाव विचार मंचाच्या माध्यमातूनही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

या मागणीला अखेर यश मिळाले असून, ‘प्रति अयोध्या’ परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे थेट कर्जत पोलीस ठाण्याच्या नियंत्रणाखाली राहणार असल्याने परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा अनुचित प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यासाठी या सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग होणार आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे ‘प्रति अयोध्या’ परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन GSB भरून रस्ता सुकर करण्यात आला आहे. यामुळे गणेश विसर्जनासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीसीटीव्हीची मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून, रस्ता सुकर झाल्याने गणेशभक्तांचीही गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे गटनेते ॲड. संकेत भासे, नगरसेविका जान्हवी सुदेश देवघर तसेच दहिवली गाव विचार मंचाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.








