ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या सौजन्याने उपक्रम
राजिप उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा उत्साहात
शहानवाज मुकादम | रोहा:
रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील ग्रामपंचायत सारसोली हद्दीतील खांदार गावात गणेशोत्सवापूर्वीच सौरऊर्जा पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण करून गाव अंधारमुक्त करण्यात आले आहे. अलिबाग जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते सौरऊर्जा पथदिव्यांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा उपक्रम अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲड. मनोजकुमार नारायण शिंदे यांच्या सौजन्याने राबविण्यात आला.
खांदार गावातील मुख्य रस्ते, चौक तसेच नागरिकांची नियमित वर्दळ असलेल्या परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सौरऊर्जा पथदिवे बसविण्यात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून सौर पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खांदार गावातील ग्रामस्थ, महिला, युवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौरऊर्जा पथदिव्यांमुळे पारंपरिक वीज व्यवस्थेवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या वीज बिलातही बचत होणार आहे. तसेच भारनियमन किंवा वीजपुरवठा खंडित झाला तरी सौरऊर्जेवर चालणारे हे दिवे परिसर प्रकाशमान ठेवण्यास उपयुक्त ठरणार आहेत.
“सौरऊर्जा हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच वीज बचत आणि गावातील सुरक्षितता यासाठी सौर पथदिवे अत्यंत उपयुक्त ठरतील. खांदार गावातील नागरिकांना या सुविधेचा मोठा फायदा होईल,” असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
खांदार गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. अनेक दिवसांपासून गावातील काही प्रमुख रस्ते व चौकांमध्ये पुरेसा प्रकाश नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणी येत होत्या. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. आता सौर पथदिवे सुरू झाल्याने रात्रीच्या वेळी गावातील रस्ते आणि परिसर प्रकाशमय होणार असून सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.
या उपक्रमासाठी ॲड. मनोजकुमार नारायण शिंदे यांचे ग्रामस्थांनी आभार मानत त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अलिबागचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी आपल्या भाषणातून चणेरा विभागातील विकासकामांवर भाष्य केले. “चणेरा विभागाचा विकास हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र सकपाळ आणि अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाचे अध्यक्ष ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे चणेरा विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गावागावांतील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि आवश्यक विकासकामांवर लक्ष केंद्रित करून ती कामे मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सकपाळ, अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाचे अध्यक्ष ॲड. मनोजकुमार नारायण शिंदे, अशोक सानप, खैरेखुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मुजम्मील गीते, योगिता शिर्के, चंद्रकांत विचारे, भालचंद्र मोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आझर मेमन, भाजप कार्यकर्ते लियाकत खोत, अब्दुल हमीद गीते, खांदार मुंबई मंडळाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच खांदार गावातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात सौर पथदिव्यांमुळे निर्माण झालेला प्रकाश आणि सुरक्षिततेचे वातावरण यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.







