दोन तासांच्या चर्चेत प्रलंबित मागण्यांना निर्णायक दिशा
श्रीकांत खुपेरकर | मुंबई:
कोल्हापूर जिल्ह्याच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रश्नांना गुरुवारी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक वळण मिळाले. रेल्वे मुख्यालयात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने तब्बल दोन तासांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या रेल्वे विकासाशी संबंधित प्रमुख प्रश्नांवर सखोल आणि मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या सातत्यपूर्ण मागण्यांनंतर ही बैठक आयोजित करण्यात आली. संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम, सचिव ज्योतिबा जाधव, उपाध्यक्ष वसंतराव पुरी बुवा, सतीश मिस्त्री, सुहास शिंदे, पारदे तसेच इतर सहकारी बैठकीस उपस्थित होते.
बैठकीतील सर्वात प्रमुख मागणी होती सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची. १९९० पासून कोल्हापूर-मुंबई प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेली सह्याद्री एक्सप्रेस बंद असून आजपर्यंत तिच्या जागी सक्षम पर्यायी सुविधा उपलब्ध झालेली नाही. याबाबत पालकमंत्री आबिटकर यांनी रेल्वे प्रशासनासमोर तीव्र खंत व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मचे काम अद्याप सुरू असून त्यास आणखी कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शक्य नसल्यास कुर्ला अथवा पनवेल येथून सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पुढील १५ दिवसांत ठोस प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. ॲड. निकम यांनी जुनी रेल्वे बंद झाली, मात्र कोल्हापूरला पर्यायी नवीन रेल्वे मिळाली नसल्याने जिल्ह्यात नाराजी असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हापूरची वंदे भारत सेवा मुंबईपर्यंत वाढविण्याचा प्रश्नही बैठकीत ठामपणे मांडण्यात आला. याबाबत रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप अंतिम आदेश आलेले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय स्तरावर पत्रव्यवहार करण्याबरोबरच पालकमंत्री व रेल्वेमंत्र्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.
पनवेल–पुणे–कोल्हापूर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही चर्चेत आली. पनवेलमार्गे कोल्हापूरशी जोडणी झाल्याने नवीन रेल्वे सुरू करण्याची मोठी संधी निर्माण झाली असून प्रस्ताव तयार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोल्हापूरला देशाच्या विविध भागांशी जोडणारे रेल्वे जाळे विकसित झाल्यास विमानतळ, पर्यटन, उद्योग, व्यापार आणि मालवाहतुकीला मोठी चालना मिळू शकते, असे संघाने निदर्शनास आणून दिले. यासोबतच पश्चिम रेल्वेमार्गाशी कोल्हापूरची जोडणी करण्याची मागणी करण्यात आली.
कोल्हापूर–मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्नही अत्यंत गंभीरपणे चर्चिला गेला. एकेरी मार्गामुळे नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यावर मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. या मार्गासाठी नवीन DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दुहेरीकरणासाठी आर्थिक तरतूद तसेच रेल्वे बोर्ड आणि रेल्वेमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण, प्रस्ताव, फिजिबिलिटी, खर्च, तांत्रिक बाबी आणि व्यवहार्यतेवरही चर्चा झाली. वरिष्ठ स्तरावर या विषयाची पुन्हा छाननी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा मार्ग कोल्हापूरला कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. पालकमंत्री आबिटकर यांनी लवकरच रेल्वेमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूर–बेळगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची सद्यस्थिती काय आहे, असा प्रश्न ॲड. निकम यांनी उपस्थित केला. सर्वेक्षण सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले. पुढील १५ दिवसांत सद्यस्थिती आणि सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच गारगोटी–गडहिंग्लज–आजरा–चंदगड–बेळगाव या पर्यायी मार्गाचाही विचार करण्याची मागणी संघाने केली.
सावंतवाडी–चंदगड–बेळगाव रेल्वेमार्गाचा प्रश्नही बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. या मार्गाचे १९७० आणि २०१८ मध्ये सर्वेक्षण होऊनही अपेक्षित आर्थिक निधी मिळालेला नसल्याबद्दल संघाने तीव्र खंत व्यक्त केली. हा मार्ग झाल्यास कोल्हापूर, कोकण, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागांतील रेल्वे संपर्काला मोठी चालना मिळू शकते आणि रेल्वेचे अंतरही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचे ॲड. निकम यांनी स्पष्ट केले. या मार्गाची पुरेशी माहिती मध्य रेल्वेकडे उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगून आवश्यक माहिती घेऊन पुढील चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूर रेल्वे स्थानकातील प्रलंबित कामांचा मुद्दाही पालकमंत्र्यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिला. स्वच्छता, दुरुस्ती तसेच मंजूर कामांपैकी काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे अधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त पाहणी करून प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
कोल्हापुरात पीट लाईन उभारण्याची गरज असल्याचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. पीट लाईन नसल्यामुळे रेल्वे गाड्यांची साफसफाई व देखभालीची कामे करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आर्थिक नियोजन, आवश्यक जागेचे नियोजन आणि रेल्वे बोर्डाशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याची गरज बैठकीत अधोरेखित झाली.
दरम्यान, गणपती, दसरा, दिवाळी तसेच एप्रिल–मे या कालावधीत कोल्हापूरसाठी अतिरिक्त व विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची ठोस मागणी पालकमंत्री आबिटकर यांनी केली. इतर जिल्ह्यांना ज्या पद्धतीने विशेष रेल्वे सेवा दिल्या जातात, त्याच धर्तीवर कोल्हापूरलाही सुविधा मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वे हक्कासाठी लोकचळवळ उभी करणाऱ्या संघाने जवळपास एक हजार गावांपर्यंत हा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार, खासदार, मंत्री, रेल्वे प्रशासन, राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून प्रश्न मांडण्यात आले. त्यामुळे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेली ही दोन तासांची बैठक लोकचळवळीची महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
बैठकीच्या शेवटी ॲड. चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “ही बैठक केवळ बैठक म्हणून नको; कोल्हापूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांच्या ठोस निकालाची सुरुवात झाली पाहिजे. कोल्हापूरला आश्वासन नव्हे, तर रेल्वेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुविधा आणि विकास हवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
संघ भविष्यातही लोकशाही, सातत्यपूर्ण आणि कायदेशीर मार्गाने कोल्हापूरच्या रेल्वे हक्कासाठी लढत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संघाने मागणीची तातडीने दखल घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच प्रत्येक मुद्दा संयमाने ऐकून आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्याबद्दल महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव व संपूर्ण रेल्वे अधिकारी वर्गाचे आभार मानले.
“पत्रानं लढाई झाली… आता निर्णयाची वेळ आली!”
दुपारी १२.०० ते २.३० वाजेपर्यंत सीएसएमटी येथे झालेल्या या बैठकीनंतर गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी मध्य रेल्वेने सीएसएमटी–कोल्हापूर–सीएसएमटी मार्गावर गणेशोत्सव विशेष म्हणून चार विशेष रेल्वे सेवा जाहीर करणारे प्रसिद्धिपत्रक जारी केले. बैठकीच्या दिवशीच झालेली ही घोषणा कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील प्रवाशांच्या तातडीच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या विशेष रेल्वे सेवांचा तपशील पुढीलप्रमाणे: गाडी क्रमांक ०१४१७ विशेष सीएसएमटीहून १२ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१८ विशेष कोल्हापूरहून १२ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या चार विशेष सेवांमुळे गणेशोत्सवाच्या काळात अतिरिक्त प्रवासी वाहतूक क्षमता उपलब्ध होण्यास मदत होईल आणि मुंबई व कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.







