सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांच्या पाठपुराव्याला यश
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर मातांना दिलासा
प्रशासकीय भवन मधील लिफ्टसाठी अखेर ६७ लाख ५८ हजाराचा निधी मंजूर
सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांच्या पाठपुराव्याला यश
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर मातांना दिलासा
ज्योती जाधव | कर्जत:
कर्जतच्या प्रशासकीय भवनात येणाऱ्या सामान्य नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा लिफ्टचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बुधवारी प्रशासन भवनासाठी रु. ६७ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कर्जतसह खालापूर, कर्जत तालुक्यातील हजारो नागरिक दररोज तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय विविध कामांसाठी येत असतात. प्रशासन भवन ही तळमजला अधिक दोन मजली इमारत असल्याने वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, अपंग बांधव आणि गरोदर महिलांना जिने चढ-उतार करताना मोठी दमछाक होत होती. उद्वाहक (लिफ्ट) नसल्याने अनेकांना कामासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमोघ कुळकर्णी यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी लेखी पत्र देऊन लवकरच मार्ग काढू असे आश्वासन देत उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर कुळकर्णी यांनी दिवाळीपूर्वी निधी मंजूर करून आणण्याचा शब्द नागरिकांना दिला होता, मात्र त्यांनी गणपती उत्सवापूर्वीच हा निधी मंजूर करून आणला.
यामध्ये अमोघ कुळकर्णी यांनी सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जलदगतीने निधी मंजूर करून घेतला, याबद्दल अधिकारी वर्गामधून त्यांचे कौतुक होत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे अधिकारी वर्गाने म्हटले आहे.दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल देवांग यांनी माहिती देताना सांगितले की, "निधी मंजूर झाला असून लवकरच लिफ्ट बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल."
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) आणि कार्यकारी अभियंता, रायगड विद्युत विभाग यांच्या प्रस्तावानुसार जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या शासन तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती रायगड गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण ( या योजनेतून रु. ६७.५८ लक्ष (अक्षरी सदुसष्ट लक्ष अठ्ठावन्न हजार) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
या कामाची कार्यान्वयीन यंत्रणा उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड असणार आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी राहुल देवांग यांनी लवकरच लिफ्ट बसवण्याचे काम सुरू होईल, असे सांगितले आहे. या निर्णयामुळे प्रशासन भवनात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून सर्व स्तरातून अमोघ कुळकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.
अमोघ कुळकर्णी यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार आहे . ही गरज होती . वयोवृद्ध जेष्ट नागरिक, गरोदर महिला आणि अपंगाना खूप त्रास होत होता. त्यांच्या त्रासाकडे कोणत्याच नेत्याने लक्ष दिले नव्हते ही खेदजनक बाब आहे - नाना देशमुख, जेष्ट नागरिक
एका कामासाठी सतत चढ उतार करून दमछाक होत होती, अखेर तसेच काम सोडून निघून जाण्याची वेळ येत होती. पण आता लवकरच लिफ्टचे काम सुरू झाले तर आम्हाला त्रास होणार नाही - अल्का शिंदे, नागरिक







