माथेरान नगरपरिषदेत हालचाल नोंदवही सुरू
आरटीआयमधून नोंदी अभिलेखात नसल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाची तातडीने दखल
प्रत्येक कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवण्याचे आदेश
दिगंबर चंदने | माथेरान:
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेतील प्रशासकीय अभिलेखांच्या जतनाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या ‘रायगडचे वादळ’मध्ये १० सप्टेंबर २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या वृत्तानंतर माथेरान नगरपरिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन हालचालींची नोंद ठेवण्यासाठी ‘हालचाल नोंदवही’ (Movement Register) सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
माथेरान नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजातील हालचाल नोंदवही, मुख्याधिकाऱ्यांची दैनंदिनी, भेट नोंदवही आणि शासकीय दौऱ्यांच्या नोंदी याबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. संबंधित कालावधीतील मागविलेली माहिती ‘या कार्यासनाच्या अभिलेख्यात आढळून आली नाही’, असे उत्तर नगरपरिषदेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यामुळे कार्यालयीन शिस्त, अभिलेख व्यवस्थापन आणि प्रशासकीय पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.
या पार्श्वभूमीवर ‘रायगडचे वादळ’ने हा विषय ठामपणे मांडल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत यापुढे प्रत्येक कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवण्याची तजवीज करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे.
प्रशासनाकडून आदेशाची माहिती
नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त, रायगड-अलिबाग पल्लवी भागवत यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “यापुढे प्रत्येक कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवण्याचे आदेश देण्यात येतील व तशी तजवीज करण्यात येईल.”
त्यामुळे माथेरान नगरपरिषदेत अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गेल्यास त्याची नोंद ठेवण्याची प्रशासकीय प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
आरटीआयमधून उपस्थित झाले होते गंभीर प्रश्न
सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार अर्जदार दिगंबर रामचंद्र चंदने यांनी २७ मे २०२६ रोजी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज करून मुख्याधिकाऱ्यांची दैनंदिनी, भेट नोंदवही, हालचाल नोंदवही तसेच शासकीय दौऱ्यांशी संबंधित नोंदींच्या साक्षांकित प्रती मागितल्या होत्या.
मात्र, ३० जुलै २०२६ रोजी मिळालेल्या उत्तरात संबंधित माहिती कार्यालयाच्या अभिलेखात आढळून आली नसल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे नोंदी तयार केल्या जात होत्या का, त्या जतन करण्यात आल्या का आणि उपलब्ध नसल्यास त्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
आता पुढे काय?
हालचाल नोंदवही सुरू करण्याच्या निर्णयामुळे भविष्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन हालचालींचा अधिकृत मागोवा घेणे शक्य होणार आहे. कार्यालयातून बाहेर जाण्याची वेळ, कामाचे कारण, भेटीचे ठिकाण आणि कार्यालयात परतण्याची वेळ यांसारख्या नोंदी उपलब्ध राहिल्यास प्रशासकीय कामकाजात अधिक शिस्त आणि पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
तसेच भविष्यातील शासकीय दौरे, प्रवासभत्ता आणि संबंधित खर्चाच्या पडताळणीसाठीही आवश्यक अभिलेख उपलब्ध राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘रायगडचे वादळ’च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल
१० सप्टेंबर रोजी ‘रायगडचे वादळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दणका आता प्रत्यक्ष प्रशासनिक कार्यवाहीत दिसून आला आहे. एका आरटीआयमधून समोर आलेल्या प्रश्नाला माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने भविष्यातील नोंद व्यवस्थेबाबत तातडीने पाऊल उचलल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मात्र, मागील कालावधीतील हालचाल नोंदवही, मुख्याधिकाऱ्यांची दैनंदिनी, दौरा नोंदी आणि प्रवासभत्ता खर्चाशी संबंधित अभिलेखांची वस्तुस्थिती काय होती, याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे जुन्या अभिलेखांचीही योग्य पद्धतीने पडताळणी करून आवश्यक ती माहिती सार्वजनिक होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
‘रायगडचे वादळ’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे प्रशासनाने घेतलेली ही दखल म्हणजे लोकशाहीतील निर्भीड पत्रकारितेच्या पाठपुराव्याला मिळालेले महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.







