रायगड जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधात्मक अधिसूचना
१९ व २५ सप्टेंबर रोजी आदेशाची अंमलबजावणी
दिगंबर चंदने | कर्जत:
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडाव्यात, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्, स्नो स्प्रे तसेच केमिकल स्प्रे यांच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात ही प्रतिबंधात्मक अधिसूचना लागू करण्यात आली आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सहाव्या दिवशी तसेच दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विसर्जन मिरवणुकांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या ध्वनी आणि प्रकाशाच्या वापराबाबत खबरदारीचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या आवाजातील डॉल्बी साऊंड सिस्टीम, डीजे, स्नो स्प्रे, हिट स्प्रे तसेच तीव्र क्षमतेच्या लेझर बीम लाईटस्चा वापर केला जातो. मात्र, या साधनांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
विशेषतः मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपकांमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होणे, बहिरेपणाचा धोका निर्माण होणे तसेच हृदयविकाराच्या रुग्णांना त्रास होणे, अशा घटना यापूर्वी घडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तीव्र क्षमतेच्या लेझर बीम लाईटस्मुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका निर्माण होतो. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार यांनाही अशा लेझर लाईटचा त्रास होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक अधिसूचनेनुसार दि. १९ सप्टेंबर २०२६ आणि दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करता येणार नाही.
या आदेशाचा भंग करून मिरवणुकीमध्ये वरील साधनांचा वापर करताना कोणतीही व्यक्ती, संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अथवा संबंधित संचालक आढळून आल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या या आदेशाचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेच्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही उत्सवाचा आनंद घेताना ध्वनी व प्रकाश प्रदूषण टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







