सहाय्यक अभियंत्यांनी आठवड्यातून दोन दिवस हजर राहावे
अतिरिक्त कार्यभाराच्या नावाखाली माथेरानकडे दुर्लक्ष नको
दिगंबर चंदने / माथेरान:
माथेरान हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असूनही येथील अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारीच कायम गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) आणि महावितरण (MSEB) चे सहायक अभियंता आपल्या माथेरान येथील कार्यालयात महिनोमहिने फिरकत नसल्याने नागरिकांना पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत समस्यांसाठीही वणवण करावी लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर दोन्ही अधिकाऱ्यांकडे इतर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. अतिरिक्त कार्यभार असणे समजू शकते, परंतु त्यामुळे मूळ ठिकाणचे काम पूर्णपणे दुर्लक्षित करणे हे चुकीचे आहे. त्यांनी आठवड्यातील किमान दोन ते तीन दिवस, ठरलेल्या दिवशी व वेळेवर माथेरान कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
सध्या पावसाळ्यानंतर पाणी पुरवठ्याची अनियमितता आणि विजेच्या वारंवार खंडित होणाऱ्या समस्या वाढल्या आहेत. तक्रार घेऊन जायचे कुठे, हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. कार्यालयात गेल्यावर “साहेब दौऱ्यावर आहेत” हेच उत्तर मिळते.
सामाजिक कार्यकर्ते जर्नादन पार्टे म्हणाले, ‘अधिकाऱ्यांना अतिरिक्त भार असेल तर त्यांनी त्याचे नियोजन करावे. पण माथेरानसारख्या ठिकाणी जिथे पाणी आणि लाईट हे जीवन-मरणाचे प्रश्न आहेत, तिथे आठवड्यातून २-३ दिवस तरी हजेरी लावलीच पाहिजे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित आदेश काढावेत, अन्यथा आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल.”असही ते म्हणाले
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित अभियंत्यांची कार्यालयीन उपस्थिती निश्चित करावी, अशी मागणी होत आहे







