दसऱ्याच्या मुहूर्तावर २० ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन होणार सुरू
दिगंबर चंदने | माथेरान:
१५ जूनपासून पावसाळ्यामुळे बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन अखेर चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही सेवा पुन्हा सुरू होणार असल्याने माथेरानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळाची सखोल पाहणी करण्यात आली असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. सर्व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यात रुळावर आलेली माती आणि दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्याचा शिरस्ता आजही कायम आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळात ही सेवा बंद ठेवली जाते. ही परंपरा आजही रेल्वे प्रशासन पाळत आहे.
दसरा-दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तोंडावरच ही सेवा सुरू होत असल्याने आबालवृद्ध, महिला आणि बच्चे कंपनीला मोठा दिलासा मिळणार आहे. पायपीट न करता आता नेरळ-माथेरान असा प्रवास या राणीच्या डब्यातून करता येणार आहे. चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा राणीची शीळ दऱ्याखोऱ्यात घुमणार आहे.







