२५० महिलांना साड्यांचे वाटप; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव
गरजूंच्या जीवनाचा खरा आधार बना – शेठ नानजीभाई ठक्कर यांचे आवाहन
नरेश जाधव | कर्जत:
समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. आधार जनसेवा सामाजिक संस्थेने अवघ्या एका वर्षात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेले कार्य कौतुकास्पद असून, आगामी काळातही संस्थेने गरजूंच्या जीवनाचा खरा आधार बनावे, असे आवाहन प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्त्व शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांनी केले.
आधार जनसेवा सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रम, कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान आणि गरजू लाभार्थ्यांना मदतीचे वाटप अशा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास अभिनेत्री मीनाक्षी मधुकर अहिरे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील परशुराम चव्हाण होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कृष्णा कांबळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
वर्षभरात १८ शिबिरे; सामाजिक कार्याचा विस्तार
आधार जनसेवा सामाजिक संस्था गेल्या वर्षभरापासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शासकीय योजना, कला, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेने पहिल्याच वर्षात तब्बल १८ शिबिरांचे आयोजन करून समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविला. संस्थेच्या या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पाताई हरिचंद्र दगडे, विचारवंत व लेखक नागनाथ डोलांरे, प्रा. डॉ. एन. डी. कदम, नगरसेवक उमेश गायकवाड, इतिहासतज्ज्ञ संजय वझरेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, साहित्यिक, कायदा, पत्रकारिता, कला आणि जनसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते अशोक ऊर्फ चंद्रकांत विरळीकर, गणेश कृष्णा कांबळे, सौ. मीनाक्षी संतोष भवार आणि सुनील परशुराम चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. कायदारत्न पुरस्कार ॲड. कैलास मोरे यांना, राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार नागनाथ डोलांरे यांना, तर पत्रकारिता पुरस्कार योगेश सरावते यांना प्रदान करण्यात आला.
जनसेवक पुरस्काराने गोपीलाल ओसवाल, आमिर मनियार, सौ. छाया प्रमोद कुलकर्णी आणि विकास वाघमारे सर (मुंबई) यांचा गौरव करण्यात आला. रणरागिणी पुरस्कार सौ. संगीता गणेश कांबळे यांना, तर कलारत्न पुरस्कार गायक मुकुंद सोनवणे आणि गायक अजय गायकवाड यांना देण्यात आला. उत्कृष्ट निवेदक म्हणून तुषार अरुण कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.
याशिवाय, रक्तदान क्षेत्रातील योगदानाबद्दल राजाभाऊ कोठारी आणि समाजसेवक संजय जाधव यांचाही गौरव करण्यात आला.
२५० महिलांना साड्यांचे वाटप; आदिवासी विद्यार्थिनींना गणवेश
वर्धापन दिनाचा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न ठेवता संस्थेने सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही राबविले. घरकाम करणाऱ्या २५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी शाळकरी विद्यार्थिनींना मोफत गणवेश देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यात आले.
या उपक्रमांमुळे गरजू महिला आणि विद्यार्थिनींना मदतीचा हात मिळाला. सामाजिक कार्यातून वंचित घटकांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सहकार्य देण्याचा संस्थेचा प्रयत्न या उपक्रमांतून अधोरेखित झाला.
संविधानातील मूलभूत अधिकारांची माहिती
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि इतर महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. यावेळी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पदाधिकारी व सदस्यांच्या मेहनतीतून सोहळा यशस्वी
वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार अरुण कांबळे, सुनील चव्हाण, रेखा उदय जाधव, आमिर मनियार, डी. एस. धनवे, सारिका राजू माने, महादेव म्हात्रे, मीनाक्षी भवार, रश्मी कांबळे, सूरज बळी यादव, संगीता कांबळे, सेजल पाल, उपाध्यक्ष संदीप पावसकर, छाया कुलकर्णी, देवेंद्र भारती, कांता गाडे, दामोदर गायकवाड आणि लीला जाधव यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प आधार जनसेवा सामाजिक संस्थेने प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने अधोरेखित केला. संस्थेच्या वर्षभरातील कार्याचे आणि वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे उपस्थित नागरिक व लाभार्थ्यांनी कौतुक केले.







