सागर शेळके यांचा स्तुत्य सामाजिक संकल्प
विवाहाची व्यवस्था, भोजन आणि कन्यादानाची जबाबदारी स्वीकारली
नरेश जाधव | कर्जत:
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि आनंदोत्सव नव्हे, तर त्या आनंदातून समाजातील गरजू घटकांच्या जीवनातही आनंद फुलवण्याची संधी असते. याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी सभापती मा. सुधाकरभाऊ परशुराम घारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतीक्षा हॉलचे संचालक श्री. सागर शशिकांत शेळके यांनी एका निराधार कन्येच्या विवाहासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कर्जत तालुक्यातील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका गरजू व निराधार मुलीच्या विवाहासाठी आपल्या ‘प्रतीक्षा हॉल’मध्ये विवाहाची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सागर शेळके यांनी जाहीर केले आहे. एवढेच नव्हे, तर विवाहाच्या दिवशी भोजनाची व्यवस्था करण्याबरोबरच कन्यादानाची जबाबदारीही त्यांनी स्वतः स्वीकारली आहे.
या विवाहसोहळ्यात सुधाकरभाऊ घारे यांच्या शुभहस्ते कन्यादान संपन्न व्हावे, अशी मनापासून इच्छा असल्याचेही शेळके यांनी व्यक्त केले आहे. एका निराधार मुलीच्या संसाराची सुरुवात सन्मानाने व्हावी, तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि तिला मायेचा आधार मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा सामाजिक संकल्प केला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आनंदासोबतच इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजू व्यक्तींना आधार देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी उपयोगात आणण्याचा सागर शेळके यांचा हा उपक्रम समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवणारा आहे.
‘खरा आनंद स्वतःसाठी जगण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद फुलवण्यात असतो!’ या भावनेतून हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपर्क : श्री. सागर शशिकांत शेळके, प्रतीक्षा हॉल – ९९२१९८४३२४.







