रेल्वे मंत्री, बोर्ड, जीएम, डीआरएम आणि एमएमआरमधील खासदारांकडून दंड वसुलीची मागणी
श्रीकांत खुपेरकर | मुंबई:
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवा सातत्याने उशिराने धावत असल्याने कर्जत आणि कसारा मार्गावरील नोकरदार प्रवाशांमध्ये संताप वाढत आहे. हा संताप आता समाजमाध्यमांवरही व्यक्त होत असून, लोकल विनाकारण उशिरा धावल्यास त्याची आर्थिक जबाबदारी निश्चित करून रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड, महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) तसेच मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) खासदारांकडून दंडाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी ‘ट्रेनकर’ प्रवाशांकडून केली जात आहे.
नोकरदारांसाठी लोकलला होणारा विलंब हा केवळ गैरसोयीचा विषय राहिलेला नाही. कार्यालयात वेळेवर पोहोचता न आल्यास पगारकपात, नोटिसा आणि काही वेळा नोकरीवरही गदा येऊ शकते. त्यामुळे रेल्वेच्या विलंबाचा आर्थिक फटका सामान्य प्रवाशांनीच का सहन करावा, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्य मार्गावर मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा विस्तार झाल्यानंतरही मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक प्रभावीपणे स्वतंत्र मार्गिकांवर वळवली जात नसेल, तर लोकल विलंबाची समस्या कायम राहणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल सेवांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावर नियमित मेल-एक्स्प्रेस किंवा मालगाड्यांचा प्रश्न नसतानाही लोकल उशिराने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावर तुर्भे यार्डमधील परिचालनामुळेही काही वेळा सेवांवर परिणाम होत असल्याचे प्रवासी सांगतात.
एसी लोकल सेवांबाबतही प्रवाशांमध्ये नाराजी असून, या लोकल अनेकदा ३० ते ४५ मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा केला जात आहे.
१५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराच्या कामामुळे टिटवाळा स्थानकात घेण्यात आलेल्या महा मेगाब्लॉकमुळे कसारा मार्गावरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आधीच असलेल्या संतापात आणखी भर पडली.
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय सल्लागार समितीचे सदस्य मनोहर शेलार म्हणाले, “मुंबई विभागातील उपनगरीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे पाहता लोकल वेळेत चालवणे निश्चितच आव्हानात्मक आहे. मात्र, तांत्रिक दोषांसारखी अपरिहार्य कारणे वगळता अन्य टाळता येण्याजोग्या कारणांमुळे लोकल उशिरा होणार नाहीत, याची खबरदारी परिचालन विभागाने घेतली पाहिजे.”
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व खासदार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने प्रवाशांच्या या सार्वत्रिक संतापाची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेलार यांनी केली.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिका सुरू होण्यापूर्वी लोकल, मालगाड्या आणि मेल-एक्स्प्रेस एकाच मार्गावरून धावत होत्या. त्यावेळी ठाणे-डोंबिवली जलद लोकलचा प्रवास सुमारे १२ मिनिटांत होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. आता कळवा, मुंब्रा आणि दिवा मार्गे धावणाऱ्या अनेक जलद लोकलना सुमारे २० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याची तक्रार आहे.
गेल्या वर्षीच्या मुंब्रा घटनेनंतर लागू करण्यात आलेले वेगावरील निर्बंध अद्याप कायम असल्याचा मुद्दाही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महानगर प्रदेशात रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार होत असताना प्रवाशांचा रोजचा प्रवास मात्र अधिक वेळखाऊ होत असल्याने ‘हा कसला विकास?’ असा सवाल आता ‘ट्रेनकर’ प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
“मुंबई प्रदेशातील हा विकास आहे का?” – हा प्रश्न आता संतप्त प्रवाशांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.







