राष्ट्रीय स्तरावर पुन्हा मानाचा बहुमान
वास्तुशास्त्रातील योगदानाला राष्ट्रीय सलाम
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | पुणे:
वास्तुशास्त्र क्षेत्रात अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत समाजप्रबोधनाची धुरा समर्थपणे सांभाळणारे डॉ. महेश निमणे यांना ‘राष्ट्रीय यशदीप वास्तु कर्तव्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सन्मान २६ जुलै रोजी पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कर्ष भारत सन्मान सोहळ्या’त प्रदान करण्यात आला.
या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले तसेच ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते डॉ. महेश निमणे यांना मानाची पगडी, शाल आणि सन्मानशिला देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. खरात, आसरा फाउंडेशन, ओम पब्लिकेशनचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. महेश निमणे यांनी गेली अनेक वर्षे वास्तुशास्त्र विषयाचा अभ्यास, संशोधन आणि जनजागृती करत या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत आजपर्यंत त्यांना ४५ हून अधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता प्राप्त झालेला ‘राष्ट्रीय यशदीप वास्तु कर्तव्य पुरस्कार’ हा त्यांच्या कार्याला मिळालेला आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. निमणे यांच्या कार्याचे कौतुक करत, वास्तुशास्त्रासोबत समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या राष्ट्रीय सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीला आणि जनहिताच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
डॉ. महेश निमणे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत असून, वास्तुशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा हा योग्य गौरव असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.








