ज्येष्ठ कलावंतांच्या न्यायासाठी आंदोलन सुरूच
शिवराम महाराज तुपे, भिकाजी महाराज पडवल यांचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट
नरेश जाधव | कर्जत:
राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेतील ‘प्रति वर्ष, प्रति जिल्हा १०० लाभार्थी’ ही जाचक अट रद्द करण्याच्या मागणीसाठी कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात सुरू असलेल्या ज्येष्ठ लोककलावंतांच्या साखळी उपोषणाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. ह.भ.प. शिवराम महाराज तुपे आणि ह.भ.प. भिकाजी महाराज पडवल यांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात आली असून, त्यांना लवकरच मानधनाचा लाभ मिळणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील अन्य वंचित ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार पोलीस मित्र संघटनेने व्यक्त केला आहे.
पोलीस मित्र संघटना (नवी दिल्ली) महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष रमेश शांताराम कदम आणि कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ कलावंत ह.भ.प. भिकाजी महाराज पडवल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ज्येष्ठ वारकरी, कीर्तनकार आणि भजन गायक वीणा, मृदुंग व टाळ हाती घेऊन उपोषणात सहभागी होत आहेत. ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागावा आणि शासनाने त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे.
१०० लाभार्थ्यांची अट रद्द करण्याची मागणी
ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी राबविण्यात येणाऱ्या मानधन योजनेत दरवर्षी, प्रत्येक जिल्ह्यातून केवळ १०० लाभार्थ्यांची निवड करण्याची मर्यादा असल्याने अनेक पात्र कलावंत लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत केवळ ९०० ज्येष्ठ कलावंतांना या योजनेचा लाभ मिळाला असून, हजारो अर्ज प्रलंबित असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, लाडकी बहीण योजना आणि किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता, ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधन योजनेवर मर्यादा का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. आयुष्यभर कला, साहित्य, वारकरी संप्रदाय आणि लोकपरंपरेची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना उतारवयात मानधनासाठी संघर्ष करावा लागणे ही खेदाची बाब असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
२०१९ ते २०२४ मधील अर्जदारांना न्याय द्या!
या योजनेत २०१९ पासून अनियमितता आणि कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, २०२४-२५ मध्ये निवड झालेल्या ३७ लाभार्थ्यांची तज्ज्ञ समितीमार्फत फेरचौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. चौकशीत अपात्र लाभार्थी आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रति वर्ष, प्रति जिल्हा १०० लाभार्थ्यांची अट तातडीने रद्द करणे, १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीतच ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मर्यादा हटविणे, २०१९ ते २०२४ या कालावधीत ऑफलाइन अर्ज करूनही लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र कलावंतांना थकीत मानधन देणे आणि २०२४-२५ मधील ३७ लाभार्थ्यांची फेरचौकशी करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
१९ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ पासून कर्जत येथे साखळी उपोषण सुरू असून, शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास १९ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्येष्ठ कलावंतांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
दरम्यान, योजनेच्या समितीचे कर्जत तालुका सदस्य ह.भ.प. कैलास महाराज भोईर यांनी आंदोलनाला पाठिंबा देत या लढ्यात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. कर्जत परिसरातील नागरिक, पत्रकार, सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडूनही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
राजकारण बाजूला ठेवून पाठिंबा देण्याचे आवाहन
पोलीस मित्र संघटनेने या आंदोलनासाठी कोणतीही वर्गणी किंवा देणगी मागितली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ कलावंतांच्या न्याय्य मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवराम महाराज तुपे आणि भिकाजी महाराज पडवल यांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट होणे हे आंदोलनाचे सकारात्मक फलित मानले जात असले, तरी उर्वरित पात्र ज्येष्ठ कलावंतांना न्याय मिळवून देण्याचे आव्हान अद्याप कायम आहे. त्यामुळे शासन या आंदोलनाची दखल घेऊन मानधन योजनेतील जाचक अटी रद्द करणार का, याकडे कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांचे लक्ष लागले आहे.







