नऊ दिवस महिलांसाठी १ ग्रॅम सोन्याच्या नथीचा विशेष लकी ड्रॉ
नरेश जाधव | कर्जत – दहिवली:
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नवतरुण मित्र मंडळ, दहिवली गुरवआळी यांच्या वतीने भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नवरात्रीचे नऊही दिवस विविध आकर्षक बक्षिसांसह लकी ड्रॉचे आयोजन करण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दांडिया महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे नऊ दिवस दररोज काढण्यात येणारा आकर्षक लकी ड्रॉ! यामध्ये मोबाईल फोनसह विविध आकर्षक वस्तू आणि भेटवस्तू जिंकण्याची संधी सहभागी नागरिकांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे, महिलांसाठी दररोज स्वतंत्र विशेष लकी ड्रॉ आयोजित करण्यात येणार असून, नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एका भाग्यवान महिलेला १ ग्रॅम सोन्याची नथ भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे नऊ दिवसांत एकूण नऊ महिलांना सोन्याची नथ जिंकण्याची संधी मिळणार आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत भक्ती, परंपरा, उत्साह आणि दांडियाच्या तालावर रंगणारा हा महोत्सव नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी देण्याच्या उद्देशाने मंडळाने या भव्य आयोजनाचे नियोजन केले आहे.
या दांडिया महोत्सवाला परिसरातील नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ, दहिवली गुरवआळी यांच्या वतीने करण्यात येत आहे.







