सेप्टिक टँक व ड्रेनेज दुरुस्तीसाठी तीन दिवसांची नोटीस
कारवाई न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
शाळकरी विद्यार्थी, पादचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सांडपाणी उघड्यावर सोडल्याने सार्वजनिक आरोग्यास धोका
नरेश जाधव | कर्जत:
कर्जत तालुक्यातील दहिवली, प्रभाग क्रमांक २, कर्जत नगरपरिषद हद्दीतील युनिमॉन्ट ऑरम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सांडपाण्याचा प्रश्न आता थेट नगरपरिषद प्रशासनाच्या कारवाईच्या कक्षेत आला आहे. इमारतीमधील सेप्टिक टँकच्या ड्रेनेज पाईपमधून सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कर्जत नगरपरिषदेने आपल्या अधिकृत नोटीसीत नमूद केले आहे.

कर्जत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी युनिमाऊंट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष/सचिवांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत सेप्टिक टँकची साफसफाई करून ड्रेनेज पाईप दुरुस्त करावा, तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून ते नियमाप्रमाणे सार्वजनिक गटाराशी जोडण्याची व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नगरपरिषद कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील लागू तरतुदींनुसार तसेच प्रचलित नियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे.

सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
युनिमॉन्ट ऑरम परिसरातील रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याच्या तक्रारीमुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी, पादचारी, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते.
रस्त्यावर सांडपाणी साचल्यास नागरिकांना घसरून पडण्यासह इतर दुर्घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे “दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यापूर्वीही तक्रारी झाल्याचा दावा
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही युनिमॉन्ट ऑरम परिसरातून शौचालय अथवा ड्रेनेजमधील पाणी रस्त्यावर येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतल्याचे सांगण्यात येते.
मात्र पुन्हा सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने यापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजना कितपत प्रभावी ठरल्या? कायमस्वरूपी उपाय का झाला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

ड्रेनेज व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी
युनिमॉन्ट ऑरम इमारतीची ड्रेनेज व्यवस्था, सेप्टिक टँक, सांडपाण्याचा निचरा, गटार व्यवस्था तसेच पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची यंत्रणा यांची कर्जत नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच इमारतीच्या सांडपाणी व्यवस्थापनामध्ये नियमांचे उल्लंघन, तांत्रिक त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बिल्डरपासून संबंधित यंत्रणेपर्यंत चौकशीची मागणी
युनिमॉन्ट ऑरम इमारतीसाठी करण्यात आलेली ड्रेनेज व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, गटारांची रचना तसेच त्यासंदर्भातील आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन झाले आहे का, याची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यापूर्वी प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणण्यात आला असेल, तर त्यावेळी कोणती कार्यवाही करण्यात आली? त्याची नोंद काय आहे? त्यानंतरही पुन्हा सांडपाणी रस्त्यावर येण्याची परिस्थिती का निर्माण झाली? याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
‘दुर्घटना होण्याची वाट पाहणार का?’
दरम्यान, रहिवासी तथा पत्रकार आणि ‘रायगडची झुंज न्यूज’चे संपादक नरेश जाधव यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. याबाबत कर्जत नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी,” अशी मागणी नरेश जाधव यांनी केली आहे.

आता तीन दिवसांत काय कारवाई होते, याकडे लक्ष
नगरपरिषदेने दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीत युनिमॉन्ट ऑरम सोसायटीकडून सेप्टिक टँकची साफसफाई, ड्रेनेज पाईपची दुरुस्ती आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कार्यवाही होते का, याकडे दहिवली परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नोटीस बजावल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी, कायमस्वरूपी उपाययोजना आणि नियमभंग आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई—नगरपरिषद प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







