मुंबई-ठाणे-कल्याण-कर्जत-कसारा तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रश्नांवर ८ प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा
श्रीकांत खुपेरकर | डोंबिवली:
मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांवर डोंबिवली जिमखाना येथे विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली.
रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. केवळ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा न करता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही प्रशासनाकडे प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, अमरावती येथे असतानाही प्रवासी संघटनांच्या विनंतीला प्रतिसाद देत आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली जिमखाना येथे बैठक आयोजित केली आणि स्वतः उपस्थित राहून प्रवासी संघटनांचे प्रश्न जाणून घेतले.
बैठकीत मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा तसेच पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी, लोकल सेवांची वारंवारता, सुरक्षितता, पायाभूत सुविधा, प्रलंबित रेल्वे प्रकल्प आणि भविष्यातील प्रवासी क्षमता वाढ यावर चर्चा करण्यात आली.

बैठकीत पुढील ८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या :
👉 कळवा-ऐरोली रेल्वे लिंक प्रकल्पातील उर्वरित भूसंपादन आणि पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामाला गती द्यावी. बदलापूर-कर्जत तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन प्रकल्पातील मंजुरी, निविदा आणि बांधकाम प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी.
👉 ठाणे येथून कर्जत आणि कसारा दिशेने गर्दीच्या वेळेत स्वतंत्र शटल लोकल सेवा सुरू करावी. सुरुवातीला २० शटल सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
👉 लोकल ट्रेनचा प्रवास वेळ कमी करण्यासाठी आणि वारंवारता वाढवण्यासाठी आधुनिक सिग्नलिंग प्रणाली लागू करावी.
👉 दिवा- वसई /विरार आणि पनवेल-वसई /दिवा मार्गावरील विद्यमान मेमू सेवांचे टप्प्याटप्प्याने ईएमयू लोकल सेवांमध्ये रूपांतर करावे.
👉 कल्याण जंक्शनचे रिमॉडेलिंग तसेच कल्याण-बदलापूर-कर्जत आणि कल्याण-आसनगाव-कसारा तिसरी व चौथी लाईन प्रकल्पांना गती द्यावी.
👉 परेल-सीएसएमटी पाचवी आणि सहावी लाईन प्रकल्पाला वेग देऊन लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र सुविधा विकसित कराव्यात.
👉 सेंट्रल रेल्वे क्षमता वाढ मिशन अंतर्गत सर्व प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घ्यावा.
👉 पश्चिम रेल्वेवरील नायगाव-जुचंद्र कॉर्ड लाईन प्रकल्पाचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. सध्या पनवेल-डहाणू आणि दिवा-वसई मेमू सेवा सुरू आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून थेट ईएमयू लोकल सेवा बोरीवली आणि अंधेरीपर्यंत सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे कल्याण, कर्जत, खोपोली आणि कसारा भागातील प्रवाशांना दादरमार्गे प्रवास करण्याची गरज कमी होऊन पश्चिम रेल्वेशी थेट संपर्क वाढेल. तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतील जोडणी सुधारून प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल.
ज्येष्ठ रेल्वे प्रवासी कार्यकर्ते भालचंद्र लोहोकारे (वय ७५ वर्षांपेक्षा अधिक) यांनी प्रवासी संघटनांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः सर्व प्रतिनिधींशी फोनवर संपर्क साधून शनिवारी कानविंदे स्पोर्ट्स सभागृहात बैठकीसाठी आमंत्रित केले. यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे प्रश्न मांडताना योग्य पद्धतीने पाठपुरावा कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
त्यांच्या या वयातील कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले आणि युवा कार्यकर्त्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रवासी संघटनांचे प्रश्न सविस्तरपणे ऐकून घेतले असून, संबंधित मागण्यांचा अभ्यास करून पुढील आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता रेल्वे प्रशासन, एमआरव्हीसी, मध्य रेल्वे तसेच संबंधित यंत्रणांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असे प्रवासी संघटनांनी स्पष्ट केले.
बैठकीस भालचंद्र लोहोकारे, मधु कोटियन, नंदकुमार देशमुख, लता आरगडे, वंदना सोनवणे, सिद्धेश देसाई, अनिकेत घमंडी, योगेश खेमकर, संदीप शहा, दिपंकर घोष, पी. व्ही. आनंदपद्मनाभन, अनिता झोपे, जयाराम केणे आणि गोविंद नवरे आदी उपस्थित होते.







