उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासोबत कर्जत शहर बचाव समितीची अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
कर्जत शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कर्जत शहर बचाव समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल सुभाष गायकवाड यांच्या दालनात पार पडली. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, अवजड वाहनांची वाहतूक, शाळा परिसरातील कोंडी तसेच रात्रीच्या गस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला कर्जत शहर बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे, सुरेशभाऊ खानविलकर, कृष्णा जाधव, विकास (बापू) चित्ते, धर्मेंद्र मोरे, भीमराव गाडे, स्वीटी बार्शी, विजय बेडेकर, सतीश मुसळे, केशव मोरे, अतुल पवार, प्रशांत उगले, तसेच पत्रकार कैलास म्हामले आणि पत्रकार विद्यानंद ओव्हाळ उपस्थित होते.
चार फाटा वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू
कर्जत शहरातील चार फाटा परिसरातील सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चार फाटा हा वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याने या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करणे, छोट्या बायपास मार्गांवर वाहतूक नियंत्रण ठेवणे आणि गर्दीच्या काळात विशेष नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
चार फाटा येथील बंद असलेला सिग्नल लवकरच सुरू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
रेल्वे ब्रिज ते नमस्ते हॉटेलदरम्यान डिव्हायडर
कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी रेल्वे ब्रिज ते नमस्ते हॉटेलदरम्यान रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर उभारण्याबाबत चर्चा झाली. गणपती उत्सवानंतर हे काम करण्याचे नियोजन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑटोमॅटिक ई-चलन कॅमेरे बसविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यास मदत होणार असून वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
तसेच गुगल मॅपच्या माध्यमातून वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून, आवश्यकतेनुसार संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

मुख्य बाजारपेठेतील कोंडीवर उपाययोजना
कर्जतच्या मुख्य बाजारपेठेत दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी हा देखील बैठकीतील महत्त्वाचा विषय ठरला. गर्दीच्या वेळेत बाजारपेठेत येणाऱ्या मोठ्या वाहनांना बाजारपेठेच्या बाहेर थांबविण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली.
तसेच बाजारपेठेतील वाहतूक व पार्किंगचे योग्य नियोजन करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
अवजड वाहनांच्या वेळेची अंमलबजावणी करण्याची मागणी
जिल्हाधिकारी यांच्या दि. 12 मार्च 2026 रोजीच्या आदेशानुसार अवजड वाहनांसाठी लागू असलेल्या बंदीच्या वेळेची तातडीने अंमलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करावी, अशी मागणी कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने करण्यात आली.
शाळा परिसरातील वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांचा मुद्दा
शहरातील विविध शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शाळांच्या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शाळा आणि शहर परिसरात बेशिस्तपणे बाइक चालविणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली.
रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी
कर्जत शहरातील दहिवली परिसर, आयोध्या परिसर, लहान पुलाजवळील गार्डन तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
वाहतूक व पार्किंगसाठी विविध विभागांची संयुक्त बैठक
कर्जत शहरातील वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन करताना अनेक विभागांच्या परवानग्या व समन्वयाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कर्जत नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), MRDC तसेच संबंधित इतर विभागांची संयुक्त बैठक प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली.
विविध विभागांनी एकत्रितपणे नियोजन केल्यास कर्जत शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या प्रश्नावर अधिक प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना करता येतील, अशी भूमिका समितीच्या वतीने मांडण्यात आली.
पोलीस विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल सुभाष गायकवाड यांनी कर्जत शहरातील वाहतूक समस्येबाबत सकारात्मक भूमिका घेत, शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पोलीस विभाग आणि कर्जत शहर बचाव समिती यांच्या समन्वयातून वाहतूक समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत कर्जत शहराच्या वाहतूक व्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण व निर्णायक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि समितीच्या समन्वयातून पुढील काळात ठोस कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीच्या शेवटी कर्जत शहर बचाव समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे यांनी वेळ देऊन वाहतूक समस्यांवर सकारात्मक चर्चा केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल सुभाष गायकवाड यांचे आभार मानले.







