‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ विचारणाऱ्या विद्यार्थीनींच्या धाडसाला मनसेची दाद
राज ठाकरे आणि अमित ठाकरेही करणार विद्यार्थीनींचा गौरव
नरेश जाधव / कर्जत:
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी शाळकरी विद्यार्थीनींनी केलेल्या धाडसी ‘रिपोर्टिंग’चे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थीनींनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत विनोदी आणि मिश्कील शैलीत तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या अनोख्या पद्धतीने विद्यार्थिनींनी मांडलेल्या जनसमस्येची दखल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही घेतली आहे.
कोंदिवडे येथील रस्त्यांची दुरवस्था दाखवणाऱ्या या व्हायरल व्हिडिओमधील विद्यार्थीनींचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज कौतुक करण्यात आले. विद्यार्थिनींनी कोणत्याही दबावाला न जुमानता आपल्या परिसरातील रस्त्यांची वस्तुस्थिती समाजासमोर मांडल्याबद्दल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना सरचिटणीस गजानन काळे आणि मनसे विद्यार्थी सेना प्रमुख संघटक यश सरदेसाई यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींनी ज्या धाडसाने आपल्या परिसरातील समस्या मांडली, त्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच लवकरच या व्हायरल व्हिडिओमधील सर्व विद्यार्थीनींचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या वतीनेही कौतुक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थिनींच्या ‘रिपोर्टिंग’ची सर्वत्र चर्चा
कोंदिवडे गावाच्या रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना करावा लागणारा त्रास या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी या विद्यार्थीनींनी पारंपरिक तक्रारीचा मार्ग न स्वीकारता स्वतःच ‘रिपोर्टर’ची भूमिका साकारली. त्यांच्या या कल्पक उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने रस्त्याच्या प्रश्नाची चर्चा तालुक्यात रंगली.
‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ अशा मिश्कील सवालांसह विद्यार्थिनींनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक होत असून, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील प्रश्नांबाबत जागरूक राहून आवाज उठवावा, असा सकारात्मक संदेश या माध्यमातून मिळाला आहे.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे, मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण राणे, मनोज भोईर तसेच मनसे विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सुयश महागावकर उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या या धाडसी उपक्रमामुळे कोंदिवडेच्या रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्यांच्या या प्रयत्नांमुळे संबंधित प्रशासनाने रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







