डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा दररोज पुस्तक वाचनाचा संकल्प
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
अभिनव एज्युकेशन ट्रस्ट संचलित शारदा मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, कर्जत येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि महान विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्याध्यापिका सौ. छाया नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. सविता यमाजी, तसेच सहशिक्षिका सौ. वृषाली घारे, सौ. मानसी कुडतरकर आणि सौ. सुजाता बडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापिका सौ. सविता यमाजी यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी सहशिक्षिका सौ. वृषाली घारे यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाचीही आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर इयत्ता दहावी ‘अ’ मधील कु. राज्ञी सावंत आणि चैतन्य पारथे या विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून वाचनाचे महत्त्व विशद केले. त्यांच्या सादरीकरणातून ज्ञानप्राप्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन किती आवश्यक आहे, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

इयत्ता दहावी ‘ब’ मधील विद्यार्थिनी कु. स्नेहल खंडागळे हिने आपण वाचलेल्या ‘राधेय’ या पुस्तकातील मनाला भावलेले काही प्रसंग उदाहरणांसह सांगितले. तिच्या मनोगतातून पुस्तकवाचनातून मिळणारे अनुभव, जीवनमूल्ये आणि प्रेरणा यांचे महत्त्व अधोरेखित झाले. तसेच कुमार मयूर श्रीखंडे यानेही आपल्या मनोगतातून वाचनाचे महत्त्व विशद केले. उपस्थित शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी आणि नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी दररोज पुस्तक वाचण्याचा संकल्प केला. नियमित वाचनाच्या माध्यमातून ज्ञानसमृद्ध, विचारशील आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अशा प्रकारे शारदा मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, कर्जत येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना पुस्तकांकडे प्रवृत्त करणे आणि नियमित वाचनाची सवय रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.







