स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय डोंबे विद्यानिकेतनमध्ये सायबर जनजागृती अभियान
विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे
नरेश जाधव | कर्जत:
कर्जत दहिवली येथील स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनमध्ये १३ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर जनजागृती मोहिमेअंतर्गत मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक आणि मोबाईलचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेच्या सकाळच्या सत्रात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब कुरुंद यांनी मार्गदर्शन केले. मोबाईलवरील फसव्या जाहिराती, अनोळखी लिंक उघडल्यामुळे होणारे संभाव्य नुकसान आणि ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार त्यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
मोबाईलचा वापर किती आणि कशा पद्धतीने करावा, इंटरनेट वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, तसेच वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देणे का टाळावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन क्रमांकांची माहितीही देण्यात आली.

दुपारच्या सत्रात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. कर्जत रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अनिल सोनोवणे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, सायबर गुन्हे, मोबाईलद्वारे होणारी डिजिटल फसवणूक आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची माहिती दिली.
ऑनलाइन जगतात वावरताना सतर्क राहणे, अनोळखी व्यक्तींच्या फोन कॉल्स आणि संदेशांवर सहज विश्वास न ठेवणे, तसेच फसवणुकीच्या प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करणे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावे आणि त्यांनी इंटरनेटचा जबाबदारीने वापर करावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कर्जत रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, ऑनलाइन फसवणुकीचे धोके आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी घ्यावयाची खबरदारी यांची माहिती मिळाली.
याप्रसंगी कर्जत रेल्वे पोलीस ठाणे पोलीस अंमलदार अजय शिर्के, महेश क्षीरसागर, हनुमंत सालगुडे, कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई घावस तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीरा कडू आणि सौ. माया म्हसे, शिक्षक किरण पालवे, राजू शिंदे, किशोर दिघे, विनायक अहिरे, चंद्रकांत शिंगोळे, सौ संगीता किरंगे, सौ. शिल्पा जाधव, सौ. रेश्मा हिंदोळे, सौ. जागृती हाडप, सौ. वैजू सासे, सौ. स्नेहल जोशी, सौ. सोनम शिंदे, योगेश लाड, विजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.








