खंडेराय मंदिराच्या प्रतिकृतीने वेधले भाविकांचे लक्ष
धामोते येथे मसदुद कुटुंबाची ७७ वर्षांची गणेश परंपरा
परंपरेसोबत साकारला भक्तिमय देखावा
मोतीराम पादीर | कर्जत:
नेरळ मधील धामोते परिसरात प्रशांत मसदुद यांच्या निवासस्थानी यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा होत आहे. मसदुद कुटुंबीयांची तब्बल ७७ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा यंदाही उत्साहात सुरू असून, या परंपरेला धार्मिक आणि कलात्मक देखाव्याची जोड देण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मसदुद कुटुंबीयांनी जेजुरीच्या खंडेरायाची तसेच जेजुरी मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्यासोबतच सुंदर आणि मनमोहक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
जेजुरीच्या मंदिराची प्रतिकृती साकारताना त्यातील विविध बारकावे जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे देखावा पाहताना भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराची आठवण येत असून, हा धार्मिक देखावा परिसरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. आकर्षक सजावट, मंदिराची प्रतिकृती आणि गणरायाची सुंदर मूर्ती यामुळे मसदुद यांच्या निवासस्थानी गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्सुकता वाढली आहे.
७७ वर्षांची अखंड गणेश परंपरा
मसदुद कुटुंबीयांकडून गेल्या ७७ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे. बदलत्या काळानुसार सजावट आणि देखाव्याचे स्वरूप बदलत असले, तरी गणरायावरील श्रद्धा आणि कुटुंबाची धार्मिक परंपरा आजही तितक्याच उत्साहाने कायम ठेवण्यात आली आहे. यंदा जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिकृती साकारून या परंपरेत एक वेगळा धार्मिक आणि सांस्कृतिक पैलू जोडण्यात आला आहे.
हा देखावा प्रशांत मसदुद यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने साकारला आहे. देखाव्यातील बारकावे, आकर्षक मांडणी आणि निर्माण करण्यात आलेले भक्तिमय वातावरण यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
दहा दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच भाविकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मसदुद कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
या गणेशोत्सवाच्या आयोजनात प्रशांत मसदुद, प्रियंका मसदुद, ॲड. वैदेही मसदुद, आदित्य मसदुद, अर्णव मसदुद आणि आर्यन मसदुद यांचा सक्रिय सहभाग आहे.







