विभावरी सिंगासने यांचा ‘आदर्श शिक्षक’ गौरव
तळोजे पाचनंद केंद्रशाळेच्या उपक्रमशील शिक्षिकेच्या कार्याची दखल
शिक्षण, संस्कार, डिजिटल अध्यापन आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान
दीपक बोराडे | नेरळ:
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत, अध्यापनात नावीन्य, सामाजिक बांधिलकी आणि डिजिटल शिक्षणाची प्रभावी सांगड घालणाऱ्या तळोजे पाचनंद केंद्रशाळेतील उपक्रमशील शिक्षिका विभावरी संदीप सिंगासने यांना रायगड जिल्हा परिषदेकडून प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तब्बल २८ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत त्यांनी विद्यार्थीकेंद्री शिक्षणाचा आदर्श निर्माण करत शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एम.ए., एम.एड. शिक्षण घेतलेल्या सिंगासने या गेली १२ वर्षे तळोजे पाचनंद केंद्रशाळेत कार्यरत असून, अध्यापनासोबतच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. विषयांचे कृतीप्रधान, अनुभवाधारित आणि सोप्या पद्धतीने अध्यापन करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन केले. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले.

विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी चित्रकला, हस्तकला, वाचन, भाषण स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कोरोना काळात डिजिटल माध्यमे, शैक्षणिक ॲप्स आणि ऑनलाइन क्विझच्या साहाय्याने शिक्षण अखंड सुरू ठेवले.
डाएट, पनवेल यांच्या ‘मैत्री भूगोलाची’ उपक्रमांतर्गत त्यांनी ऑनलाइन माध्यमातून भूगोल विषयाचे अध्यापन केले. ‘झेडपी लाईव्ह’ या प्लॅटफॉर्मद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे यांच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत पीएम ई-विद्या आणि दीक्षा ॲपसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार केले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी त्यांनी संवाद, समुपदेशन आणि सकारात्मक मार्गदर्शनावर भर दिला. पालकसभा, जनजागृती उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शाळा व पालक यांच्यातील समन्वय मजबूत केला. स्वच्छता, आरोग्य, मुलींचे शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण केली.
कोरोना काळात ‘युवा अनस्टॉपेबल’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून २३० विद्यार्थ्यांना जीवनावश्यक अन्नधान्य किट उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय सामाजिक कार्य त्यांनी केले. शासनाच्या ‘आयडॉल टीचर’ उपक्रमात पनवेल तालुक्यातील पहिल्या मानकरी ठरल्या. नवोपक्रम स्पर्धेत परसबाग निर्मितीसाठी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला, तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत पनवेल तालुक्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
इयत्ता सहावीच्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयासाठी प्रश्नसंच व दिनदर्शिका निर्मिती, भोपाळ अभ्यासदौऱ्याचे आयोजन, आर्थिक साक्षरतेसाठी बँक भेट आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे त्यांनी नेतृत्व केले.
मुस्लिमबहुल परिसरातील तळोजे पाचनंद शाळेत सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी यासाठी आषाढी वारी, पोंगल, ओणम यांसारखे विविध सांस्कृतिक सण साजरे करून त्यांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
रायगड जिल्हा परिषदेकडून मिळालेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार हा विभावरी सिंगासने यांच्या २८ वर्षांच्या समर्पित, विद्यार्थीकेंद्री आणि समाजाभिमुख कार्याचा गौरव मानला जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेने माझ्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मला ‘आदर्श शिक्षक’ म्हणून जो सन्मान दिला, तो माझ्या सर्व विद्यार्थी, पालक आणि मला सहकार्य करणाऱ्या सर्वांना समर्पित करते. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचा सर्वांगीण विकास हेच माझ्या कार्याचे केंद्र राहिले आहे. यापुढेही विद्यार्थीहितासाठीचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील - श्रीमती विभावरी संदीप सिंगासने शिक्षिका, तळोजे पाचनंद केंद्रशाळा







